रत्नागिरी : दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:36 PM2018-08-01T16:36:01+5:302018-08-01T16:36:05+5:30
मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.
रत्नागिरी : मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.
यात अनिल विजय शिरोटे आणि रोहीत रावसाहेब शिरोटे हे दोघे ठार झाले. निवास आनंद थोरात अत्यवस्थ आणि दीपक भुपाल शिरोटे किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील रहिवासी असून, ते अंगारकीनिमित्त गणपतीपुळेकडे जात होते.
अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार मार्गावरच होती. अपघात पाहून त्यांना वाचवण्यासाठी कारचालकाने लगेचच गाडीचे ब्रेक लावल्याने त्यांची गाडी गटारात गेली. त्याला दुखापत झालेली नाही.
तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील दीपक शिरोटे, अनिल शिरोटे (२५), निवास थोरात (२६) आणि रोहित शिरोटे (२७) हे चौघेजण दोन दुचाकी घेऊन सोमवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले. रोहित आणि दीपक हे एका दुचाकीवर (एमएच 0८-एम २३७0) होते. अनिल आणि निवास हे दुसऱ्या दुचाकीवर (एमएच १0 - एए - ८0१३) होते. मंगळवारी अंगारकी असल्याने गणपतीपुळे येथे जाऊन देवदर्शन घेण्यासाठी ते निघाले.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते निघाले. पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अनिल आणि निवास पुढे गेले. रोहित आणि दीपक मागे राहिले होते. ते अजून आले का नाहीत, हे पाहण्यासाठी अनिल व निवास फिरून परत आले. दुर्दैवाने हातखंबा ते निवळीदरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या.
हा अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार निवळीहून हातखंब्याकडे जात होती. अपघात झाल्यामुळे कारचालकाने आपल्या गाडीला अचानकच ब्रेक लावला. त्यात ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. अपघातात दीपक शिरोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हे अपघात होताच क्षणी लगतच्या पेट्रोल पंपात गेले. त्यानंतर नरेंद्र महाराज संस्थानची रूग्णवाहिका घेऊन धनेश केतकर घटनास्थळी पोहोचले. त्यातून सर्वांना जिल्हा रूग्णालयात आणले गेले.
मित्र-मित्रच एकमेकांवर आदळले
अपघातग्रस्त चौैघेही तरूण एकाच गावातील आहेत. गणपतीपुळेला जाण्यासाठी ते एकत्रच गावातून बाहेर पडले. या दोघांची एकमेकांशीच टक्कर झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. मित्रच एकमेकांवर आपटल्याने अपघात झाल्याचा प्रकार प्रथमच रत्नागिरीत झाला.