रत्नागिरी : एकाच महिन्यात दोन महिन्यांची देयके, महावितरणचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:22 PM2018-10-26T13:22:12+5:302018-10-26T13:24:12+5:30
रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
रत्नागिरी : शहरातील बाजारपेठ परिसरातील ग्राहकांकडे एकाचवेळी दोन महिन्यांची देयके येऊन थडकल्याने त्यांची झोप उडाली आहे. महावितरणने चालू महिन्यातील बिले बनविण्यास उशीर केल्याचे या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, ही दोन्ही देयके रक्कम भरायची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती पडल्याने ग्राहकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
गेले काही महिने वाढीव बिले देण्याचा महावितरणचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात तर महावितरणने कहरच केला. रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसर, तेलीआळी आदी भागात गेल्या दोन महिन्यांचे बिल एकाच महिन्यात काही दिवसांच्या फरकाने देण्यात आले आहे.
ही दोन्ही बिले त्या बिलावरील रक्कम भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर ग्राहकांना पोहोच करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच वाढीव बिल आणि त्यानंतर उशिरा बिले भरण्यामुळे लागणारा विलंब आकार यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. काही दिवसांच्या फरकाने ही बिले दारावर येऊन थडकल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर झाला आहे.
महावितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ही बिले वरिष्ठ कार्यालयाकडून उशिराने बजावण्यात आली आहेत. शहराच्या काही भागात ही समस्या निर्माण झाल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. महावितरणने दुसऱ्या महिन्याचे बिल २४ आॅक्टोबरला वितरित केले. त्यापूर्वीचे बिल अनेक ग्राहकांनी भरले असले तरी दुसरे बिल प्रिंट करेपर्यंत पहिल्या बिलाची रक्कम कंपनीपर्यंत न पोहोचल्याने त्या बिलाची रक्कमही नवीन बिलात वाढवून देण्यात आली आहे. दोन बिलांच्या वितरणामध्ये केवळ सात दिवसांचा फरक आहे. त्यामुळे नवीन बिल कमी करून घेण्यासाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.
बिलात फरक
१७ आॅक्टोबरला ही बिले ग्राहकांना देण्यात आली. या बिलांवरील तारीख ही त्या अगोदरचीच होती. त्यामुळे विलंब आकाराचा फटका ग्राहकांना बसलाच; परंतु ज्यांनी आठवडाभरात बिले भरली नाहीत, त्यांच्या दारात २३ तारखेलाच महावितरणचा कर्मचारी वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यासाठी हजर झाला. या कारभाराबद्दल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दोन महिन्यांची वेगवेगळी बिले
महावितरणने वितरित केलेल्या वीजबिलावर आणि आॅनलाईन वीजबिलावर बिलाची रक्कम वेगवेगळी दाखवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, आॅनलाईन वीजबिल हे दोन महिन्यांचे एकत्रितरित्या बनवण्यात आले आहे तर जी बिले वितरित करण्यात आली आहेत, ती दोन महिन्यांची वेगवेगळी बनविण्यात आली आहेत.