रत्नागिरीत भाजी विक्रेते-नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:31 PM2019-03-06T17:31:17+5:302019-03-06T17:34:14+5:30
रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविके्रत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार केली होती.
जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मूळ जागेवरच या भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत स्वाभिमान पक्षाने या भाजी विक्रेत्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर नगरपरिषदेने शहरातील फिरते विके्रते, स्टॉल्स, भाजी व फळ विके्रत्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर मारूती मंदिर येथील भाजी विक्रेते क्रीडांगणाच्या मागील बाजूला स्थलांतरीत झाले होते.
मात्र, बुधवारी सकाळी भाजी विके्रत्या महिला पुन्हा क्रीडांगणाच्या पुढील बाजूला भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी त्याठिकाणी आपल्या पथकासह दाखल झाले. त्यांनी भाजीविक्रेत्या महिलांचे सामान उचलण्यास सुरूवात केली. या कारवाईला भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध करण्यास सुरूवात केली. या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला.
भाजीविक्रेत्या महिलांविरोधात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याची माहिती स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वजण त्याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे कर्मचारी आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली. स्वाभिमानचे कार्यकर्त्यांनी आधी शहरातील इतर विके्रत्यांवर कारवाई करा मगच भाजीविक्रेत्या महिलांना हटवा अशी मागणी करत शहरातील विक्रेते बसलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेले. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते.
अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत वाहनांसह पोलीस स्थानकात आणले. याबाबत परस्पर विरोधी तक्रार देण्याचे काम सुरू होते.