रत्नागिरी : भाजीपाला, धान्य उत्पादनाची तीस वर्षे, शिरगावच्या अनंत शिंदे यांची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:15 PM2018-05-18T16:15:34+5:302018-05-18T16:15:34+5:30
टाईपरायटिंग मशीन दुरूस्ती व्यवसायासाठी जिल्हाभर करावा लागणारा दौरा, त्यातून होणारा शारीरिक आणि आर्थिक त्रास लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या २४ गुंठे जागेत भाजीपाला लागवड सुरू केली आणि तब्बल तीस वर्षे त्यांनी या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करून स्वत:ला सिद्ध केले.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : टाईपरायटिंग मशीन दुरूस्ती व्यवसायासाठी जिल्हाभर करावा लागणारा दौरा, त्यातून होणारा शारीरिक आणि आर्थिक त्रास लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या २४ गुंठे जागेत भाजीपाला लागवड सुरू केली आणि तब्बल तीस वर्षे त्यांनी या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करून स्वत:ला सिद्ध केले.
शेती फायदेशीर नाही असं ंम्हणणाऱ्यांना चपराकच देणारे हा प्रयोगशील शेतकरी आहे अनंत धोंडू शिंदे! रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे त्यांनी घाम गाळून हे यश पिकवले आहे. केवळ भाजीपालाच नाही तर फुले आणि द्विदल धान्याच्या माध्यमातूनही त्यांनी आपला मळा फुलवला आहे.
व्यवसाय बंद करून शेतीकडे वळल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे त्यांनी उन्हाळी भातपीक घेण्यास सुरूवात केली. परंतु, ऊन्हाळी पिकावर रोग येऊन नुकसान झाल्यामुळे अखेर भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला.
यासाठी त्यांनी भात काढणीनंतर भाड्याने पॉवर टिलरद्वारे संपूर्ण क्षेत्राची नांगरणी करून ठराविक आकाराचे वाफे तयार केले. त्यामध्ये मुळा, माठ, पालक, वांगी, भेंडी, पडवळ, दुधीभोपळा, वालीच्या शेंगा, चवळी, केळी ही पिके टप्प्याटप्प्याने लावली.
याचवेळी एका भागात झेंडूदेखील लावला. भाज्यांबरोबर झेंडूचाही खप चांगला होत असल्यामुळे गेली ३० वर्षे भाजीपाला लागवडीचा त्यांचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. त्यामध्ये त्यांना यशही मिळत आहे.
आपणाला शेतीमध्ये खूप स्वारस्य होते. त्यामुळे आवड म्हणून या व्यवसायाकडे वळलो. आता त्यात बऱ्यापैकी यशही मिळत आहे. त्यामुळे आपण अजूनही कष्ट करत असल्याचे आणि त्यातून अर्थार्जनाइतकेच समाधानही आपल्याला मिळत असल्याचे ते म्हणाले.
अनंत शिंदे यांनी आज पंच्चाहत्तरी ओलांडली असून, त्यांच्या पत्नी अनिता ६५ वर्षांच्या आहेत. मात्र, तरीही हे दाम्पत्य शेतात अखंड राबत असते. शेतीसाठी ते एक-दोन मजुरांचे सहाय्य घेतात.
शिंदे यांना तीन मुलगे व एक मुलगी असून, प्रत्येकजण आपापल्या दिनक्रमात व्यस्त आहे. शिंदे दाम्पत्याने मात्र भाजीपाला लागवडीकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. दररोज शेतातील भाज्या काढणे, भाज्यांना पाणी लावणे, तण काढणे, नवीन लागवड करणे, भाज्यांच्या जुड्या बांधून विक्रीला पाठवणे यासारखी कामे दोघेही स्वत: करतात. रत्नागिरी शहरात या भाज्या विक्रीला पाठवतात.
यामागे त्यांची प्रचंड मेहनत व भरपूर कष्ट आहेत. दिवसभर शेतात राबताना मिळणारे समाधान वेगळे असल्याचे शिंदे सांगतात. शिंदे यांची मुले आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. मात्र, शिंदे दाम्पत्य भाजीच्या मळ्यात कार्यरत असल्यामुळे अन्य ताणतणावापासून लांब आहे. दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री छान झोपही लागते.
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आरोग्यदेखील चांगले असल्याचे शिंदे आवर्जून सांगतात. घरी विकवलेल्या भाज्यांचा वापर ते आपल्या दैनंदिन आहारातदेखील करतात. भाजीपाला पिकावर रासायनिक खतांचा मारा न करता, केवळ सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या त्यांच्याकडील भाज्यांचा खपदेखील चांगला होतो.
शिंदे दाम्पत्याकडील या विविध भाज्या गावातीलच दोन महिला विक्रीसाठी रत्नागिरी शहरात नेतात. यातून या दोन महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीतील आवड जपताना या व्यवसायातून उपजीविकेचे एक साधनही प्राप्त झाले. कष्ट केल्याने त्याचे चांगले फळही मिळत आहे. व्यायामही होत आहे, असेही शिंदे आवर्जून सांगतात.
पावसाळी भातपीक घेतल्यानंतर आॅक्टोबरपर्यंत भातकापणी पूर्ण होते. त्यानंतर २४ गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये टप्प्याटप्प्याने आखणी करून रोपे लावली जातात. पध्दतशीर नियोजन करून भाज्या लावल्या जात असल्याने एकाचवेळी विविध भाज्या बाजारात पाठविता येतात.
दुधी भोपळा, दोडके, पडवळाचे वेल लगडतात. वालीलाही चांगली मागणी असते. सणासुदीला झेंडूचा खपही चांगला होतो. भाज्या ताज्या असल्याने विक्रीदेखील चांगली होते. माकडांचा उपद्रव वाढल्यामुळे कायमस्वरूपी शेतावर थांबावेच लागते. भाजीपाला लागवडीतील मूल्य पटल्यामुळेच शिरगाव परिसरात बहुतांश शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले आहेत. शेतातील कामाचा फायदा मानसिक, शारीरिकदृष्ट्या होतोच. शिवाय उतारवयातील आर्थिकस्रोतही त्यामुळे सापडला आहे.
- अनंत धोंडू शिंदे,
शिरगाव