रत्नागिरी : विघ्रवली गावाच्या विकासासाठी गावकरीही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:47 PM2018-05-29T17:47:36+5:302018-05-29T17:47:36+5:30

संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. त्यांनतर सुमारे १८ वर्षे मुंबईत प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू आहे. मात्र, हे करताना अतिशय दुर्गम भागात वसलेल्या आपल्या गावासाठी काही तरी करावे, या तळमळीतून विघ्रवलीचे (ता. संगमेश्वर) सुपुत्र प्रा. कमलाकर विठ्ठल इंदुलकर हे सुटीचा सदुपयोग करून ग्रामस्थांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी धडपडत आहेत.

Ratnagiri: Villagers too have sought the development of the village | रत्नागिरी : विघ्रवली गावाच्या विकासासाठी गावकरीही सरसावले

रत्नागिरी : विघ्रवली गावाच्या विकासासाठी गावकरीही सरसावले

Next
ठळक मुद्देसुट्टीचा सदुपयोग गावच्या विकासासाठीइंदुलकर गणेशोत्सव, होळीसाठी येतात आपल्या मूळ गावी विघ्रवलीलापाणीटंचाई कामाला सुरुवात.

शोभना कांबळे

रत्नागिरी : संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. त्यांनतर सुमारे १८ वर्षे मुंबईत प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू आहे. मात्र, हे करताना अतिशय दुर्गम भागात वसलेल्या आपल्या गावासाठी काही तरी करावे, या तळमळीतून विघ्रवलीचे (ता. संगमेश्वर) सुपुत्र प्रा. कमलाकर विठ्ठल इंदुलकर हे सुटीचा सदुपयोग करून ग्रामस्थांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी धडपडत आहेत.

बहुतेक व्यक्ती आपल्या गावातून शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेल्या की, मग नोकरी तिथेच मिळवितात. उच्च शिक्षण मुंबईत झाले तर मग बघायलाच नको. त्यांचे राहणीमानही पूर्णत: बदलते. शहराची सवय झाल्याने मग गावाची वाट ही मंडळी पार विसरूनच जातात. गावाचे नाते सांगण्यासाठी केवळ गणपती किंवा होळीच्या सणासाठी येणं, एवढाच संबंध उरतो.

मात्र, याला अपवाद आहे, तो कमलाकर इंदुलकर यांचा. मुंबईत बालपण आणि त्यानंतर उच्च शिक्षण झाले. गेली १८ वर्षे ते मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर्वाधिक काळ मुंबईत जात असला तरी प्रा. इंदुलकर गणेशोत्सव, होळीसाठी आपल्या मूळ गावी विघ्रवलीला येतात.

विघ्रवली दीडशे कुटुंबांचे आणि सुमारे ९०० लोकसंख्या असलेले पाच वाड्यांचे गाव. निसर्गरम्य असले तरी मूलभूत सुविधांची वानवा. गावासाठी काहीतरी करण्याची अतीव इच्छा निर्माण झाली. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या आॅक्टोबरमध्ये गावाला आल्यानंतर येथील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण सर्वेक्षणाला सुरूवात केली.

हे करताना त्यांना गावाची प्रमुख समस्या पाणीटंचाई असल्याचे जाणवले. अजूनही पिण्याचे पाणी मिळाले की झाले, अशी मानसिकता लोकांची आहे. शेतीसाठीही पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी पाण्याची पातळी वाढविली पाहिजे, पाणी साठवणूक केली पाहिजे, ही मानसिकता निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांना बरोबर घेऊन त्यांनी पाण्यावर काम करण्याचे ठरविले.

गावातील युवकांसाठी डिसेंबरमध्ये प्रेरणा शिबिर घेतले. ग्रामपंचायत सदस्यांबरोबर चर्चा केली. आता गावकरीही इंदुलकर यांच्यासोबत गावाच्या विकासासाठी पुढे आलेत. श्रमदानाने ग्रामस्थांचे काम वेगात सुरू आहे. इंदुलकर यांनी सुटीचा कालावधी गावच्या विकासासाठी घालवायचा, हा निर्णय घेतला आहे.


सध्या महाविद्यालयाला सुटी असल्याने इंदुलकर एप्रिल महिन्यात गावाला आलेले आहेत. रविवारीही गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण पाच वाड्यांसाठी माळवाशी येथील गणपती मंदिरात श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते. एवढेच नव्हे; तर गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाची डायरीही तयार करण्यात आली आहे. आता विघ्रवलीतील युवा पिढीमध्ये गावच्या विकासाबाबत प्रबोधन करण्यात प्रा. इंदुलकर यशस्वी झाले आहेत. गावाच्या शक्तीवर त्यांचा विश्वास आहे.

समाधानाची बाब

प्रत्येक बाबीसाठी आवश्यक असणारे सर्व दाखले, कागदपत्र यांचे महत्व प्रा. कमलाकर इंदुलकर यांनी गावाला पटवून दिले आहे. त्यासाठी संंबंधित अधिकारी यांची भेट घेऊन ही कागदपत्र कशी मिळतील, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिकारी शासकीय चाकोरीतून काम करत असताना सहकार्यासाठी पुढे येतो आहे, ही बाब समाधानाची असल्याचे प्रा. इंदूलकर सांगतात. विघ्रवली गाव छोटेस आणि दुर्गम असल तरी निसर्गसौदर्याने नटलेले आहे. प्रा. इंदुलकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गावाची डायरीही तयार केली आहे. एवढेच नव्हे तर व्रिघवली या भागात सापडणाऱ्या ९५ पक्षांची माहितीही संकलित करण्यात आली असल्याचे ते सांगतात.
 

विघ्रवली गावचे ग्रामस्थच आपल्या गावच्या विकासासाठी पुढे आले आहेत. मी निमित्तमात्र आहे. आतापर्यंत झालेले काम हे गावकऱ्यांनीच आपल्या गावाच्या विकासासाठी केलेले काम आहे. या पाचही वाड्यांमधील ग्रामस्थांच्या एकजुटीतूनच या गावाचा विकास होणार आहे.
- प्रा. कमलाकर इंदुलकर
 

Web Title: Ratnagiri: Villagers too have sought the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.