रत्नागिरी : आपुलकीची ओवाळणी, निराधारांसाठी उपक्रम, पोलिसांकडून बँडचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:56 PM2018-11-10T17:56:49+5:302018-11-10T17:59:26+5:30
रत्नागिरी येथील आपुलकी या सामाजिक संस्थेने निराधार मुलींचा दिवाळी सण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस बॅण्ड पथकाचा विशेष कार्यकम माहेर संस्थेच्या मुलांसमोर सादर करण्यात आला. बँडच्या तालावर अगदी आजीपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांची पावलेही तितक्याच ऊर्जेने थिरकली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह पाहून उपस्थित सारेच भारावून गेले.
रत्नागिरी : येथील आपुलकी या सामाजिक संस्थेने निराधार मुलींचा दिवाळी सण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस बॅण्ड पथकाचा विशेष कार्यकम माहेर संस्थेच्या मुलांसमोर सादर करण्यात आला. बँडच्या तालावर अगदी आजीपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांची पावलेही तितक्याच ऊर्जेने थिरकली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह पाहून उपस्थित सारेच भारावून गेले.
आपलुकी' या सामाजिक संस्थेकडून माहेरमधील मुलांसाठी भाऊबीज भेट म्हणून पोलीस बँडचा कार्यकम ठेवण्याची विनंती केली होती, त्यानुसार हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भाऊबीजनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांसमोर रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस बँड पथकाने जयोस्तुते, सत्यम शिवम सुंदरम, सारे जहाँ से अच्छा, जहाँ डाल डाल पर' ही गाणी व दोन मराठी चित्रपटांची धून वाजवली. या गीतांच्या तालावर मुलांचे पाय आपोआपच थिरकले. यामध्ये काही आजींचाही समावेश होता. जवळपास पाऊणतास हा संगीत कार्यकम रंंगला.
संस्थेतून शाळेत आणि शाळेतून संस्थेत असा या मुलांचा दिनक्रम असतो. वेगळे काहीतरी मुलांसाठी करायची संस्थेची इच्छा असते. मात्र, नियमाच्या चौकटीत काही बाबी करता येत नाहीत. आपुलकीने मुलांची दिवाळी खरोखरच आनंदमयी केल्याची प्रतिक्रिया माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी व्यक्त केली.
या सर्व पोलीस बँड पथक टीमला निराधार मुलींनी भाऊबीज भेट म्हणून सुंदर असे शुभेच्छा कार्ड आणि त्यांनी बनवलेली कागदी फुले दिली. यावेळी आपुलकीकडून दिवाळी भेट म्हणून फराळाचेही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना जान्हवी पाटील यांनी केली, तर सौरभ मलुष्टे यांनी आभार मानले. यावेळी बँड पथक टीम यांच्यासह आपुलकीचे विनोद पाटील, प्रथमेश पड्याळ उपस्थित होते.
माहेरला आर्थिक मदत
रत्नागिरी पोलीस मुख्यालय बॅण्ड पथकाकडून सामाजिक बांधिलकीतून भाऊबीज ओवाळणी म्हणून माहेर संस्थेला आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली. पथकातील सर्व पोलिसांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे.