रत्नागिरी :सात वर्षांनंतर कुटुंबियांशी भेट, विजापूरच्या राजूला माहेरमुळे मिळाले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 02:18 PM2018-09-07T14:18:37+5:302018-09-07T14:22:54+5:30
निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे.
रत्नागिरी : निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या राजू नामक मनोरूग्णाला संस्थेच्या पाठपुराव्यामुळे अखेर सात वर्षांनंतर घर मिळाले. त्याच्या नातेवाईकांकडे संस्थेने त्याला नुकतेच स्वाधीन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आष्ठा - बावची रोडवर अनेक वर्षे फिरणाऱ्या या मनोरूग्णाला स्थानिक तरूण वैभव मोरे, अमरदीप काटे व माहेर संस्था, मिरजचे कार्यकर्ते अभिजीत कांबळे यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील माहेर संस्थेत पाच महिन्यांपूर्वी दाखल केले होते. तो तरूण संस्थेत दाखल झाल्यावर फक्त आपले नाव राजू चव्हाण असे सांगत होता.
पूर्ण पत्ता सांगण्यास तो सक्षम नव्हता. माहेर संस्थेत त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. येथील अधीक्षक सुनील कांबळे व अमित यांनी वारंवार त्याच्याशी चर्चा केली. विजापूर जवळ बरदगी नावचे आठ लमान तांडे असल्याचे कळले.
पुन्हा त्याच्याशी संवाद साधला, तेव्हा तो बरदगी तांडा नं. ३ येथील असल्याचे कळले. त्यानंतर विजापूर पोलीस ठाण्यातून ग्रामीण पोलीस ठाण्याचा नंबर मिळाला. तेथील पुजारी हवालदार यांनी दोन दिवसात राजूचे नातेवाईक शोधले.
दुसऱ्याच दिवशी राजूचे काका रूपसिंग चव्हाण व पुतण्या रत्नागिरीत हजर झाले. साखरपुढा होऊन तीन महिन्यांनी राजू बेपत्ता झाला होता. तो सात वर्षे बेपत्ता होता, असे या नातेवाईकांनी सांगितले.
गोरमाटी भाषा राजू हा लमाणी समाजाचा असून, तो गोरमाटी भाषा बोलतो आहे, हे लक्षात आल्यानंतर सुनील कांबळे यांची पत्नी विजया हिला गोरमाटी बोलता येत असल्याने तिने राजूशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याचे पूर्ण नाव राजू रामचंद्र चव्हाण, गाव बरदगी, विजापूर असे सांगितले.