भारतात पहिल्यांदाच होतीय 'फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपिआड स्पर्धा', रत्नागिरीच्या सुपुत्राची पंच पदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:55 PM2022-08-01T15:55:59+5:302022-08-01T16:39:51+5:30
भारतात ही स्पर्धा प्रथमच होत असून, जगभरातील १८४ देशांतील खेळाडू ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
रत्नागिरी : ४४ वी फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपिआड स्पर्धा दि. २९ जुलै पासून महाबलीपुरम, चेन्नई येथे सुरू झाली आहे. त्यात रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी यांची पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे.
भारतात ही स्पर्धा प्रथमच होत असून, जगभरातील १८४ देशांतील खेळाडू ह्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जगज्जेता मॅग्नस कार्लसन, अनिष गिरी, विदित गुजराथी, लिओन आरोनिअन, सॅम शंखलंड, मुझिचुक भगिनी, कोनेरू हम्पी यांच्या सारख्या एकूण १७५० हुन अधिक नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी विवेक साेहनी यांना मिळाली आहे.
जगभरातून २५० पंच या स्पर्धेत काम करत असून एवढ्या मोठ्या चमूत काम करण्याचा, नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याचा व पाश्चात्य देशांतील अनुभवी पंचसोबतच्या वार्तालापाचा अनुभव पुढे जाऊन नक्कीच उपयोगी पडेल असे विवेक साेहनी यांनी सांगितले.
२०१६ मध्ये रत्नागिरीच्या चैतन्य भिडे व कोल्हापूरच्या भरत चौगुले यांच्या आग्रहाखातर ह्या क्षेत्रात आलो आणि त्यानंतर सर्व गोष्टी आपसूकच घडत गेल्या अशी प्रांजळ कबुलीही दिली. गेल्या ६ वर्षाच्या ह्या कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यात दिल्लीच्या गोपाकुमार, चेन्नईच्या आनंद बाबू, बंगलोरच्या वसंथ बी एच आणि बिहारच्या धर्मेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाचा तसेच कुटुंबियांच्या सहकार्याचा मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजित कुंटे यांनी आनंद व्यक्त करत सर्व शुभेच्छा दिल्या.