रत्नागिरी : राजापुरातील वेत्ये समुद्रात मच्छिमारी बोटीला जलसमाधी, सातजणांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:57 PM2018-08-20T15:57:21+5:302018-08-20T16:00:37+5:30
राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.
राजापूर : तालुक्यातील वेत्ये समुद्रत मच्छिमारीसाठी निघालेल्या बोटीला सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान जलसमाधी मिळाली. मात्र, बोटीवरील सातजणांनी मोठा आरडाओरडा केल्यानंतर आजुबाजुला असलेल्या बोटीतील मच्छिमारांनी तात्काळ धाव घेऊन त्या सातही जणांना बुडत्या बोटीतून सुखरुप बाहेर काढले.
समुद्रात बुडालेली बोट तुळसुंदे येथील असून, ती महालक्ष्मी या नावाची होती. तुळसुंदेमधील नितीन देवकर हे बोटीचे मालक आहेत. त्यांच्या समवेत जगदीश शिरगावकर, पुरुषोत्तम नाटेकर, कुंदन आडिवरेकर, भिकाजी आडिवरेकर, संजय पावस्कर व मारुती खडपे असे सातजण सोमवारी तुळसुंदे बंदरातून समुद्रात मच्छिमारीसाठी निघाले होते.
सकाळी सातच्या दरम्यान त्यांची बोट किनाऱ्यापासून साधारणपणे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आली असता अचानक जोरात वारा वाहू लागला. त्यानंतर काही क्षणातच बोटीच्या तळाची लाकडी फळी फुटून आता पाणी भरु लागले व बोट समुद्रात हेलखावे खावू लागली.
अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे बोटीवरील मालकासह अन्य सहाजण गोंधळून गेले. त्यांनी जोरदार आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी बुडत असलेल्या बोटीपासून आजुबाजुलाच काही अंतरावर सात ते आठ बोटीदेखील समुद्रात मच्छिमारीसाठी चालल्या होत्या. त्यावर असलेल्या मच्छिमारांनी खलाशांचा गोंधळ पाहिला आणि ते त्याठिकाणी पोहचले. त्यांनी दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या सातही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मात्र, लाकडी फळी तुटल्याने त्या बोटीला जलसमाधी मिळाली. या घटनेमध्ये नितीन देवकर यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस ठाण्याचे निरीक्षक कानसे व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले.