रत्नागिरीत प्रभागवार नालेसफाई सुरू, पावसाळा तोंडावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:46 PM2018-05-24T13:46:01+5:302018-05-24T13:46:01+5:30
मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले.
रत्नागिरी : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील प्रत्येक प्रभागातील गटारे व नालेसफाईचे काम हाती घेतले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पहिल्या टप्प्यातील नालेसफाईचे काम शहरात करण्यात आले. त्यानंतरही शहरांमधील नाले व गटारांमध्ये पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नगर परिषद आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे प्रभागवार सफाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरात १५ प्रभाग असून, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत गेल्या पाच महिन्यांपासून शहर स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे. त्यातच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे दोन महिन्यांपूर्वीपासूनच शहरातील नाले व गटारांच्या सफाईचे काम सुरू होते. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतील स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे.
नाले व गटारे सफाईच्या या मोहीमेअंतर्गत प्रत्येक प्रभागात २० सफाई कामगारांच्या मदतीने सफाईचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू झाल्याने १५ प्रभागातील काम पूर्ण होईपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्वच्छतेबाबत जागरुकता, दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या नाले व गटारांच्या सफाईनंतरही अवघ्या काही दिवसात पुन्हा गटारे कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, डबर यांनी भरून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नाल्यांची सफाई पावसाळ्याआधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होणार असा नगर परिषदेला विश्वास वाटतो आहे. मात्र तसे न झाल्यास पावसाळ्यात रत्नागिरी शहरात अतिवृष्टीच्यावेळी पाणी तुंबण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.