रत्नागिरी दुसऱ्याही दिवशी शांतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:42+5:302021-04-12T04:28:42+5:30
रत्नागिरी : काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘वीकेंड लाॅकडाऊन’च्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ...
रत्नागिरी : काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘वीकेंड लाॅकडाऊन’च्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवल्याने रत्नागिरी शांतच हाेती. त्यातच रविवार असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने रस्त्यांवर शांतता पसरली हाेती.
शासनाने वीकेंड लाॅकडाऊनची घाेषणा करताना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली हाेती. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने शनिवारी सकाळपासूनच वाहनांची वर्दळ कमी दिसत हाेती. शनिवारी सर्वच दुकाने बंद ठेवल्याने शहरातील गजबजणारी ठिकाणेही शांत हाेती. शहरातील मारुती मंदिर, परटवणे, साळवी स्टाॅप, भाट्ये या भागात पाेलीस बंदाेबस्त तैनात ठेवण्यात आला हाेता. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत हाेती. त्यानंतरच वाहनांना साेडण्यात येत हाेते. रविवारी, दुसऱ्या दिवशीही रत्नागिरीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत हाेता.
सकाळच्या वेळेत सुरू असणारी दूध सेंटर्स दुपारनंतर मात्र बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे मेडिकल वगळता अन्य काेणतीच दुकाने सुरू नव्हती. रविवार हा सुटीचा वार असल्याने अनेकजण हाॅटेल्स किंवा समुद्रकिनारी फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, लाॅकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. घरातच जेवणाचे विविध पदार्थ तयार करून रविवार साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील मांडवी व भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरही नागरिकांनी गर्दी केली नव्हती. त्यामुळे नेहमीच सुटीच्या दिवशी गजबजणारे समुद्रकिनारेही लाॅकडाऊनमुळे शांत दिसत हाेते.