रत्नागिरीची पाणी समस्या कायमच-- प्रश्न सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:29 PM2020-03-13T12:29:15+5:302020-03-13T12:29:41+5:30
रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो.
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रत्नागिरीकर त्रस्त आहेत. २०१६ साली शासनाने मंजूर केलेल्या व खर्च ६३ कोटींवर पोहोचलेल्या सुधारित नळपाणी योजनेचे कामही धीम्या गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजूनही दीड ते दोन वर्र्षे जाणार आहेत. पाणी समस्या जैसे थे आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील महिला पाण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेवर दररोज धडक देत आहेत. रत्नागिरीची पाणी समस्या नेमकी सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
रत्नागिरी शहराला दररोज १६ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील साठा संपुष्टात आला असला तरी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा आहे. ही स्थिती यावर्षीचीच नाही तर दरवर्षी शहरासाठी शीळ धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत आणणारी मुख्य जलवाहिनी जागोजागी गंजल्याने पाण्याची गळती मोठी आहे. अंतर्गत जलवाहिन्याही जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संपूर्ण रत्नागिरीकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी होऊनही त्यात बदल झाला नव्हता.
पाणी समस्येने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांसाठी भाजपचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६मध्ये ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना नगरोत्थान योजनेतून मंजूर केली. त्यामध्ये आणखी ९ कोटी वाढीव अंदाजपत्रक बनविण्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली आणि त्यामुळे बराच काळ हे काम रखडून राहिले होते. दीड वर्षापूर्वी या योजनेचे काम सुरू झाले. तरीही हे काम रडत खडत सुरू आहे. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर असले तरी काही काम अद्याप रखडलेले आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यानुसार शहरातील काही भागांमध्ये अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. हे काम ३० टक्केपर्यंत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बरेच काम अद्याप अपूर्ण असल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराकडून आवश्यक त्या वेगाने काम होत नसल्याने शहरवासियांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रत्नागिरीतील नागरिक पाणी समस्येला तोंड देत आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा ही मोठीच समस्या झाली असून, केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही रत्नागिरीकरांना टॅँकरद्वारे अधिकचा पाणीपुरवठा करण्याची वेळ नगर परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून आली आहे. अद्याप टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नवीन योजनेचे काम पूर्ण कधी होईल, याची निश्चिती नसल्याने रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत.
सत्ताधाऱ्यांचे आजवर दुर्लक्षच
रत्नागिरी शहरातील पाणी समस्या ही गेल्या दहा वर्षांपूर्वीच सोडविण्याची गरज होती. मात्र, या कालावधीत नगर परिषदेत सत्तेत असलेल्यांनी शहराच्या पाणी प्रश्न सोडवणुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यातच मंजूर योजना राजकीय वादामध्ये अडकल्याने आणखी उशीर झाला आहे. आता नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी योजनेच्या कामाला गती देण्याची मागणी होत आहे.