रत्नागिरी : शिवकालीन भुयारे नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:15 PM2018-06-09T14:15:57+5:302018-06-09T14:15:57+5:30
लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे.
प्रभानवल्ली गावात आढळलेल्या ऐतिहासिक तीन भुयारांचा त्यात समावेश आहे. या गूढ भुयारांवर कोरण्यात आलेली शिलालेखावरील भाषा ही अरब भाषेशी साधर्म्य सांगणारी आहे. या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणालाही कळलेला नाही. या शिलालेखाचा अर्थ कळल्यास भुयाराच्या अंतर्गत भागातील माहितीचा खजिना उलगडू शकतो, अशी शक्यता आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात व सह्याद्रीच्या कडेकपारीत अतिशय दुर्गम भागात प्रभानवल्ली हे गाव वसलेले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा गाव व परिसर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाने दणाणून जात असे. या प्रभानवल्ली गावात फेरफटका मारल्यानंतर इतिहासाच्या खुणा जागोजागी आढळतात. त्यापैकीच एक असलेली म्हणजे या ठिकाणी आढळणारी गूढ अशी भुयारे होय.
मुचकुंदी नदीच्या काठाशी तीन भुयारे आढळतात. तीनही भुयारे प्रभानवल्लीतील गूढ भुयारे आहेत. ही भुयारे काळ्या दगडाने व एकसारख्या रूपात बांधलेली आहेत. यातील डावीकडील दोन भुयारांवर दोन वेगवेगळे शिलालेख कोरण्यात आलेले आहेत.
भुयारांचे प्रवेशद्वार ४ ते ५ फूट रूंद आहे. आतील व्यास प्रवेशद्वाराएवढाच मोठा आहे. ५ ते ६ व्यक्ती सहज बसू शकतील एवढे हे भुयार आहे. या भुयारांचा नेमका मार्ग कोणालाच माहिती नाही. अंतर्गत भागात भुयारे बंद स्थितीत असल्याचे आढळतात.
या गूढ अशा भुयारांपासून काही मीटरच्या अंतरावर नदीच्या पात्रात पाटकोंड नावाची खोल कोंड (डोह) आढळते. ही कोंड बाराही महिने पाण्याने भरलेली असते. संपूर्ण नदीपात्र उन्हाळ्यात कोरडे पडलेले असताना या पाटकोंडीतील पाणी मात्र अजिबात आटत नाही.
पाटकोंडीत वरील भुयारांतून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचे सांगण्यात येते. हा सुरक्षित व छुपा मार्ग असल्याचे मानले जाते. या मार्गाने थोडे अंतर पोहून जाऊन थेट नदीच्या पलिकडे जाता येते.
नदीच्या पलिकडे गेल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुडवत गेल्यानंतर थेट विशाळगड गाठणे शक्य होते, असेही येथील जाणकार सांगतात. प्रभानवल्ली गावापासून विशाळगड अवघ्या दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे.
शिवकालीन इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या या तीनही गूढ गुहांबाबत पुरातत्त्व खात्याने योग्य ती कार्यवाही करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच गुहांवर लिहिण्यात आलेल्या शिलालेखाबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथील अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. या भुयारांचे संवर्धन न झाल्यास इतिहासाची साक्षीदार असणारी येथील गूढ भुयारे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
विशाळगडाकडे जाणारा मार्ग?
ही भुयारे शिवकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही भुयारे ऐतिहासिक विशाळगडाकडे जातात. संकट काळात या भुयारांमधून पलायन केले जात असे. असेही सांगण्यात येते. या तीन भुयारांपैकी एकच भुयार विशाळगडाकडे जाते. उर्वरित दोन भुयारे ही शत्रूला चकवा देण्यासाठीच तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
केवळ दोन भुयारांवरच शिलालेख
भुयारावर कोरण्यात आलेली शिलालेखावरील भाषा ही अरब भाषेशी साधर्म्य साधणारी असली तरी ती अरब नसल्याचे कळते. त्यामुळे या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणाला कळलेला नाही. एकसारख्या दिसणाऱ्या या तीनही भुयारांपैकी केवळ दोन भुयारांवर शिलालेख कोरलेला आहे. शत्रूला गुंगारा देण्यासाठीच या तीन भुयारांची निर्मिती केली गेली असावी.