रत्नागिरी : अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:52 PM2018-06-27T17:52:17+5:302018-06-27T17:59:20+5:30
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.
गुणवत्तेची भरपाई गुणांनी होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अभिनंदनीय आहेत. लोकमत आयोजित कार्यक्रमात सर्व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांनाही विविध शाखांविषयीचे ज्ञान अवगत झाले.
दहावी व बारावी हा सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर ते अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’तर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुभाष देव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
सध्याच्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थी, पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंग निवडतानासुध्दा ठराविक शाखांपेक्षा संलग्न शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.
निवडीबरोबर पर्यायांचाही वापर केला पाहिजे. बहुतांश पालक दहावी, बारावीनंतर सक्रीय होतात. मात्र, तसे न करता प्रवेश घेण्यापूर्वीच सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. विविध संस्थांना भेटी देऊन तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थी काय शिकतो, याऐवजी कशासाठी व तो किती महत्त्वाचा आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. दहावीतील गुण पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विसरले पाहिजेत, असाही सल्ला डॉ. देव यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उच्च शिक्षणातील विविध संधी, विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.