रत्नागिरी : नगराध्यक्षपदापदासाठीचे अर्ज अवैध, देवरूखात नगराध्यक्षपदाची समीकरणे बदलणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:10 PM2018-03-22T13:10:26+5:302018-03-22T13:10:26+5:30
देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध अर्ज हे अवैधच ठरले. त्यामुळे देवरुख नगरपंचायत निवडणुकीचे समीकरणच बदलणार आहे.
सचिन मोहिते
देवरुख : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अवैध अर्ज हे अवैधच ठरले. त्यामुळे देवरुख नगरपंचायत निवडणुकीचे समीकरणच बदलणार आहे.
नगराध्यक्षपदापदासाठी सध्या तरी तीनच उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये शिवसेनेच्या धनश्री नंदादीप बोरकर, स्वाभिमानच्या मिताली तळेकर आणि अपक्ष अनघा निकम यांचा समावेश आहे. मिताली तळेकर या राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानमधून निवडणूक लढवित आहेत.
पक्षातून काढता पाय घेतलेल्या तळेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पाठिंबा देणार नाही. मात्र, अनन्या कांबळे यांच्या पाठीशी आघाडी उभी राहण्याचे संकेत मिळत आहेत. अनन्या कांगणे यांना कुणबी सेनेचा पहिल्यापासूनच जोरदार पाठिंबा आहे, किंबहुना कुणबी सेनेच्या सहकार्यामुळेच त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणबी समाजाच्या मतांवरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. संपूर्ण समाज त्यांच्या पाठिशी आहे. कांगणे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरतोय, अशी स्थिती असताना १९ तारखेपूर्वी एका पक्षाने एबी फॉर्मची आॅफरही त्यांना जाहीर केली होती. मात्र, त्या अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्या.
शिवसेनेचा मुख्य विरोधी पक्ष भाजप आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात नसल्यास भाजप - मनसे युतीदेखील अपक्ष असलेल्या अनघा कांगणे यांनाच पाठिंबा देऊ शकतील ? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
अशा प्रकारची बोलणीदेखील वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची गोपनीय माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कांगणे यांना कुणबी समाजाची एकगठ्ठा मते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजप युतीने पाठिंबा दर्शविल्यास अनघा कांगणे यांच्या रुपोन एक तगडे आव्हान नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उभे राहणार आहे.
मिताली तळेकर यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची अशी स्वत:ची मते त्यांच्याकडे आहेत. याचबरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने सेनेत नसतानाही गत निवडणुकीत एका बाजूने किल्ला लढवित सेनेचा बालेकिल्ला राखला होता. त्यावेळी तब्बल सात नगरसेवक निवडून आणले होते.
अनघा कांगणे यांना पाठिंबा?
प्रस्थापित राजकीय पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अवैध ठरतात, ही राजकीय अपरिपक्वता असल्याची प्रतिक्रिया संगमेश्वर - चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी विरोधकांना चपराक देताना दिली. मात्र, नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले आहेत, तोच निकाल जिल्हा न्यायालयात कायम राहिला तर मात्र सगळीच समीकरणे बदलणार आहेत. कदाचित अपक्ष असलेल्या अनघा कांगणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबरच भाजपची युती पाठिंबा देऊ शकते? अशी चर्चा देवरुख शहरात ऐकायला मिळत आहेत.