रत्नागिरी : मामाच्या लग्नातच उरकणार भाच्याची मुंज? - प्रचाराचा जोम वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:14 PM2019-04-08T17:14:58+5:302019-04-08T17:16:44+5:30
येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही
रत्नागिरी : येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारातच विधानसभा निवडणुकीचे धुमारे फुटू लागले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचार ही विधानसभेच्या छुप्या प्रचारासाठीची मोठी संधी ठरत आहे. भावी उमेदवार म्हणून मैदानात उतरू पाहणारे अनेकजण लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेचा प्रचार छुप्या रितीने करीत आहेत. लोकसभा प्रचार सभांमधूनही विधानसभेच्या उमेदवारीची इच्छा जाहीररित्या व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे ‘मामाच्या लग्नात भाच्याची मुंज’, या म्हणीचा प्रत्यय जनतेला येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या स्थितीत सर्वच राजकीय पक्षांमधील विधानसभा उमेदवारीला इच्छुक असलेल्यांनी उचल खाल्ली आहे. लोकसभेचा प्रचार करताना वरिष्ठ नेत्यांकडून स्वत:च्या उमेदवारीचे पान लावून घेण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. तसेच काही इच्छुक प्रचार सभांच्या व्यासपीठावरून आपल्या उमेदवारील आशीर्वाद मागत आहेत. त्याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगत आमच्याकडेही लक्ष ठेवा, असे सांगत आहेत.
पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होती. मात्र, नंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. यावेळीही लोकसभेला युती झाली आहे. मात्र, येत्या दिवाळीच्या जवळपास होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही युती टिकेल की नाही, याबाबत आतापासूनच शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे युती झाली तर काय व नाही झाली तर काय स्थिती असेल, यावरून विधानसभेच्या उमेदवारीची गणिते मांडली जात आहेत. जशी युतीमध्ये स्थिती आहे, तशीच कॉँग्रेस आघाडीमध्ये स्थिती आहे. त्यामुळे युती व कॉँग्रेस आघाडीमध्येही लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या उमेदवारीची व विजयाची शक्यता पडताळून घेतली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास रत्नागिरी व गुहागर हे दोन मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येणार आहेत. अन्य तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीला जाणार आहेत. चिपळूणमध्ये सेनेचे सदानंद चव्हाण, रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत, राजापूरमध्ये सेनेचे राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत, तर गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व दापोलीत राष्ट्रवादी चे संजय कदम हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हे आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
गुहागरमधून भाजपकडून विनय नातू यांच्या नावाची चर्चा आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीतर्फे शेखर निकम यांनी उमेदवार म्हणून आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आमदार प्रसाद लाड यांचे नाव रत्नागिरीतून चर्चेत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ मानेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राजापूरमध्ये अजित यशवंतराव हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रचाराची रणधुमाळी
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार शिवसेना, भाजप, रासप व रिपाइं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कॉँग्रेस आघाडीतर्फे या मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉँग्रेसचाही प्रचार सुरू झाला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रचार सभा अद्याप दिसून येत नाहीत.