रत्नागिरी : वेळ बघूनच श्वान चावणार का? : श्वान चावलेल्या रूग्णासाठीही वेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:28 PM2018-06-12T17:28:30+5:302018-06-12T17:28:30+5:30
श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे.
दापोली : श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे.
दापोली तालुक्यात श्वान चावण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. श्वान चावल्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण जखमी झाले आहेत. या रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचार मिळण्यास मदत होत आहे.
श्वानदंशावर तत्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये योग्य तो औषधसाठाही ठेवण्यात आला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. असे असले तरी तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात मात्र श्वान चावल्यास देण्यात येणाऱ्या इंजेक्शनसाठी वेळच ठरवून दिली आहे. या वेळेनुसार सकाळी किंवा सायंकाळी एखाद्याला श्वानाने दंश केल्यास त्याला इंजेक्शन मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेतच श्वानदंशाची लस किंवा इंजेक्शन दिले जाणार असल्याची सूचना भिंतीवर चिकटवण्यात आली आहे. त्यामुळे आसूद आरोग्य उपकेंद्रअंतर्गत कोणालाही श्वानाने चावा घेतल्यास आधी वेळ बघा नंतरच लस घ्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
त्यातच वेळ बघूनच श्वानाला सांगावे लागेल, असेही ग्रामस्थांतून बोलले जात आहे. आसूद आरोग्य केंद्राच्या इमारतीबाहेर लावण्यात आलेल्या सूचनेवर आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची सही आणि शिक्काही आहे. त्यामुळे ही सूचना अधिकृत असल्याचेही दिसत आहे. अशा प्रकारच्या अनोख्या सूचनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.