रत्नागिरीचे श्वानपथक होणार मजबूत, तीन नवीन श्वान दाखल होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 01:18 PM2018-03-11T13:18:04+5:302018-03-11T13:18:04+5:30

गुन्ह्यांच्या तपासाला दिशा देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते श्वानपथकाची. तब्बल ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनच हे श्वान पोलीस दलात सहभागी होतात.

Ratnagiri will get strong, three new dogs to enter | रत्नागिरीचे श्वानपथक होणार मजबूत, तीन नवीन श्वान दाखल होणार 

रत्नागिरीचे श्वानपथक होणार मजबूत, तीन नवीन श्वान दाखल होणार 

googlenewsNext

-अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : गुन्ह्यांच्या तपासाला दिशा देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते श्वानपथकाची. तब्बल ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनच हे श्वान पोलीस दलात सहभागी होतात. रत्नागिरीतील पोलीस दलात काम करणाऱ्या  श्वानांनी गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी बजावली आहे. रत्नागिरीचे हे श्वानपथक अधिक मजबूत करण्यासाठी आणखीन तीन नवीन श्वान लवकरच दाखल होणार आहेत. यातील दोन श्वान डेक्कनपूर आणि एक श्वान पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे.

रत्नागिरीतील श्वानपथकाची स्थापना २००९मध्ये करण्यात आली. त्यावेळी श्वानपथकात चार श्वान दाखल झाले होते. त्यामध्ये ‘डॉबरमन पिंचर’ जातीचे दोन आणि ‘लॅब्रेडॉर’ जातीचे २ श्वान होते. डॉबरमन पिंचर जातीचे श्वान हे गुन्ह्याचा माग काढण्याकरिता आणि शोध घेण्याकरिता वापरण्यात येतात. लॅब्रेडॉर श्वान हे बॉम्बशोधक म्हणून वापरण्यात येतात.

श्वानपथकात दाखल होणाºया श्वानांना खास प्रशिक्षण देण्यात येते. श्वान आणि त्याला हाताळणारा पोलीस यांच्यातील समन्वय वाढावा, यासाठी हे प्रशिक्षण देत असताना त्यांना हाताळणारे पोलीसही त्यांच्यासमवेत असतात. चोरी, खून, घरफोडी अशा घटनांमध्ये चोरट्याचा माग काढणे, वस्तूचा शोध घेणे यासाठी वापरण्यात येणा-या या श्वानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. 

अंमली पदार्थ, स्फोटकांचा शोध यासाठी वापरण्यात येणा-या श्वानांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच हे श्वान पथकात दाखल होतात. या श्वानांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र पुणे आणि मध्यप्रदेशमधील डेक्कनपूर येथेच आहे. याठिकाणी श्वानांना प्रशिक्षण दिले जाते.

रत्नागिरीच्या श्वानपथकात सध्या व्हिक्टर, रॅम्बो, विरू आणि शेरू हे श्वान कार्यरत आहेत. या श्वानांनी रत्नागिरीतील गुन्ह्यांच्या तपासकामात चांगली कामगिरी बजावली आहे. राज्यात नव्याने १८१ श्वान घेण्यात आले आहेत. यामधील तीन नवीन श्वान रत्नागिरीच्या पथकात दाखल होणार आहेत. त्यासाठी या श्वानांचे प्रशिक्षण सध्या पुणे आणि डेक्कनपूर येथे सुरू आहे. त्यामधील विराट हा श्वान पुणे येथे तर अ‍ॅलेक्स आणि माही या श्वानांचे डेक्कनपूर येथे प्रशिक्षण सुरू आहे.

या श्वानांची दिनचर्या सकाळी ६ वाजता सुरू होते. त्यानंतर दिवसभर ठरलेल्या वेळेनुसारच त्यांची काळजी घेतली जाते. रत्नागिरीतील श्वानपथक हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर राऊत यांच्या निगराणीखाली काम करत असून, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण अंतर्गत हे पथक कार्यरत आहे. 

श्वानाचे हस्तक-

श्वानांना सांभाळणाऱ्यांना हस्तक असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रथम हस्तक आणि दुय्यम हस्तक असतात. रॅम्बोसाठी प्रथम हस्तक भूषण राणे, दुय्यम हस्तक वैभव आंब्रे, व्हीक्टर - सूरज गोळे, नागनाथ पाचवे, शेरू - मंगेश नाखरेकर, रणजित जाधव, वीरू - गिरीश सार्दळ, सागर उगळे हेच श्वानांची काळजी घेतात. 

पशुवैद्यकीय चिकित्सकाकडून तपासणी-

श्वान घेताना क्रॉस, ब्रिडींग, गावठी अथवा नौरस श्वान घेतले जात नाही. श्वानांची दृष्टी व वास घेण्याची क्षमता चांगल्या प्रकारची असावी लागते. श्वान घेतल्यानंतर त्याची शासकीय पशुवैद्यकीय चिकित्सकाकडून तपासणी करून घेतली जाते.

श्वान मोबाईल व्हॅन-

श्वानांना ने-आण करण्याकरिता विशिष्ट बनावटीचे एक खास वाहनही वापरले जाते. हे वाहन पूर्णपणे वातानुकुलित असते. त्यामध्ये श्वानाची राहण्याची वेगळी व्यवस्था असते. प्रवासादरम्याने श्वानाला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते.

संचलनासाठी विशेष प्रशिक्षण-

श्वानाला प्रशिक्षण देताना सुरूवातीचे तीन महिने त्याला आज्ञाधारक म्हणून तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये त्याला सांभाळणा-या हस्तकाच्या सूचना त्याने पाळणे गरजेचे असते. उठणे, बसणे, धावणे यासारख्या सूचना देतानाच पोलीस संचलनामध्ये सलामी देण्याचेही प्रशिक्षण दिले जाते.

नोंदणीकृत संस्थेकडूनच श्वान-

राज्य गुन्हा अन्वेषण केंद्र गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच हे श्वान घेतले जाते. हे श्वान जातीवंत व उच्च वंशावळीतील आहेत का, याची तपासणी केली जाते. तसेच दि इंडियन नॅशनल कॅनल क्लब किंवा दि कॅनल क्लब आॅफ इंडिया या मान्यताप्राप्त संस्थांकडूनच नोंदणीकृत श्वान घेतले जातात.

बेल्जियम मेनोलाईज लवकरच येणार-

‘बेल्जियम मेनोलाईज’ या जातीच्या श्वानाची काम करण्याची क्षमता इतर श्वानांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रात केवळ कोल्हापूर आणि गडचिरोली याचठिकाणी हे श्वान आहे. रत्नागिरीच्या पोलीस दलात हे श्वान दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे श्वान आणण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आहे. हे श्वान पोलीस दलात दाखल झाल्यास पोलीस दलाची ताकद आणखीन वाढणार आहे. 

व्हीक्टर श्वान -

रत्नागिरीच्या श्वान पथकात असणारे हे श्वान जर्मन शेफर्ड जातीचे असून, १ वर्षाचे आहे. हे श्वान अंमली पदार्थ, नार्को शोधकासाठी वापरले जाते. हे श्वान घटनास्थळातील घर, व्यक्ती, वाहन यांची तपासणी घेते.

‘डॉबरमॅन’चे श्वान-

हे श्वान डॉबरमन जातीचे असून, २ वर्षाचे आहे. चोरी, खून, घरफोडी या गुन्ह्यांच्या शोधासाठी हे श्वान वापरले जाते. पोलीस ठाण्यांतर्गत चोरीचा गुन्हा घडल्यानंतर या श्वानाची पोलीस स्थानकाकडून मागणी करण्यात येते. घटनास्थळी संशयित व्यक्तीने हाताळलेल्या वस्तूचा वास देऊन त्याचा माग काढला जातो.

विरु आणि शेरु...

विरू आणि शेरू हे दोन्ही श्वान भावंड असून, ते ८ वर्षांचे आहेत. हे श्वान लॅब्रेडॉर जातीचे आहेत. बॉम्ब शोधकसाठी त्यांचा वापर केला जातो. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी, परदेशी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, संवेदनशील ठिकाण, अचानक येणारे बॉम्ब कॉल अशा प्रकरणांमध्ये हे श्वान घटनास्थळी जाऊन तपासणी करतात.

श्वानाची जात अन् गुन्हा-

प्रत्येक जातीचा श्वान हा अमूक एका गुन्ह्यासाठीच वापरला जातो. त्याला त्या पध्दतीचे प्रशिक्षणही दिले जाते. मात्र, एका प्रकारच्या गुन्ह्यासाठी कधीच दुस-या श्वानाचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात तत्परता येते.

चोरट्याचा शोध घेणे कठीण-

चोरी झाल्यानंतर श्वानाला तेथील संशयित वस्तूंचा वास दिला जातो. त्या वासानुसारच श्वान चोरट्याचा माग काढत असतो. मात्र, चोरीनंतर तेथे इतर वस्तू पसरल्याने नेमकी चोरट्याने हाताळलेली वस्तू न मिळाल्याने श्वान तेथेच घुटमळत राहते. त्यामुळे चोरट्याचा माग काढणे कठीण जाते. आपल्याकडील पूर्णगड आणि सावर्डे येथील चोरीचा छडा लावण्यात श्वानांची भूमिका महत्त्वाची होती. यावेळी चोरट्याचे राहते घर दाखवून गुन्ह्यात श्वानाने मार्गदर्शन केले.

- सुधाकर राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्वानपथक, रत्नागिरी

अशी असते श्वानांची दिनचर्या-

-सकाळी ६ वाजता नैसर्गिक विधीस सोडणे

-सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सराव घेणे

-सकाळी ८.३० वाजता श्वानांची साफसफाई

-सकाळी १० वाजता जेवण देणे, नैसर्गिक विधीस सोडणे, पुन्हा कॅनेलमध्ये बंद

-सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत प्रशिक्षण

-सायंकाळी ६ वाजता जेवण.

 

 

Web Title: Ratnagiri will get strong, three new dogs to enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.