रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीमुळे फळबाग लागवड योजनेला खीळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:16 PM2018-05-11T14:16:20+5:302018-05-11T14:16:20+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतवर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून यशस्वी केला. त्यामुळे यावर्षी तब्बल १०,००० हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मग्रारोहयो) फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतवर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून यशस्वी केला.
त्यामुळे यावर्षी तब्बल १०,००० हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या बदलीमुळे या योजनेच्या अंमलबजावणीला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यांच्या दुरूस्ती कामाचाही वेग मंदावणार आहे.
प्रदीप पी. यांनी १२ जून २०१५ रोजी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या प्रदीप पी. यांनी नंदूरबारनंतर रत्नागिरीतही प्रशासन गतिमान होण्यासाठी विविध उपक्रम राबवले.
प्रारंभीच त्यांनी ई - आॅफीस संकल्पना राबवली. लोकशाही दिनात नागरिकांसाठी दूरध्वनीवरून तक्रारींंची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर २४ तास कार्यरत अद्ययावत तक्रार कक्षाचा उपक्रम सुरू केला. वर्षभरातच या कक्षाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ४०० तक्रारी या कक्षाकडे दाखल झाल्या.
प्रदीप पी. यांच्या कारकीर्दीत महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाला तो म्हणजे जिल्ह्यातील पडीक ५ हजार हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्यात आली. यावर्षी हे उद्दिष्ट १० हजार हेक्टरपर्यंत वाढवण्यात आले आहे. गतवर्षी दहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, पाच हजार हेक्टरवर रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार क्षेत्रावरच लागवड झाली.
यावर्षी १०० टक्के लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी प्रदीप पी. यांनी नियोजन केले आहे. त्यासाठी आतापासून अगदी प्राथमिक स्तरावर अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे. रोपांची कमतरता पडू नये, यासाठीही प्रदीप पी. यांनी आधीपासूनच नियोजन केले आहे.
त्यानुसार यावर्षी खासगी रोपवाटिकांमधून सुमारे साडेचौदा लाख, कृषी खात्याच्या शासकीय रोपवाटिकांमधून सुमारे पाच लाख आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून साडेचार लाख रोपांची उपलब्धता केली जाणार आहे.
तसेच गतवर्षी जिल्ह्यातील ६५ मंडळांचा यात सहभाग होता. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असल्याचे फड यांनी सांगितले.
प्रदीप पी. यांच्या कारकीर्दीत सुरू असलेला दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सातबारा उताऱ्यांची दुरूस्ती. रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक २१ लाख इतके सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. उताऱ्यांची दुरूस्ती करण्याची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू आहे. यात अनेक अडचणी आल्या. मात्र, प्रदीप पी. यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ७५ टक्के दाखल्यांमध्ये दुरूस्ती झाली आहे.
२५ टक्के दाखल्यांचे काम क्लीष्ट असल्याने मागे राहिले आहे. अनेक सातबारा उताऱ्यांवर खातेदारांची नावे जास्त असल्याने त्यात दुरूस्ती करणे अवघड होत आहे. कनेक्टिव्हीटी, सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी यात लक्ष घातल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली असतानाच प्रदीप पी. यांच्या बदलीमुळे उर्वरित २० टक्के कामाचा वेग मंदावणार आहे. फळबाग लागवड तसेच सातबारा दुरूस्ती या कामांवर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या बदलीमुळे परिणाम होणार आहे.
अधिकाऱ्यांचे रोखले होते वेतन
प्रदीप पी. यांनी उण्या-पुऱ्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लावली आहेत. तक्रारींचा निपटारा वेळीच होण्यासाठी अधिकाऱ्यांनाही त्यांच्या सक्त सूचना असायच्या. एवढेच नव्हे तर नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याची कारवाई केल्याने अधिकारीही सक्षमपणे काम करू लागला आहे. हा कारभार असाच सुरळीत सुरू रहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतींच्या सहभागाचा निर्णय
जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या गतवर्षीच्या अनुभवावरून यावर्षी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सर्वच ग्रामपंचायतींना लागवडीमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
रोपांची गतवर्षीप्रमाणे कमतरता जाणवू नये, यासाठीही यावर्षी शासकीय तसेच खासगी रोपवाटिकांमधून पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन झाले आहे. यासाठी सर्व यंत्रणांसोबत प्रदीप पी. सातत्याने बैठका घेऊन समन्वय ठेवत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीने वेग घेतला आहे.
सातबारा संगणकीकरणासाठी स्वतंत्र सर्व्हर
जिल्ह्यात एकूण २० लाख ८४ हजार ८३ सातबारा उतारे आहेत. यापैकी सध्या १६ लाख उताऱ्यांची दुरूस्ती पूर्ण झाली आहे. उर्वरित चार लाख उताऱ्यांची दुरूस्ती शिल्लक आहे. या सातबारा उताऱ्यावर अनेक खातेदार असल्याने दुरूस्तीचे काम अतिशय काम क्लीष्ट आहे.
मात्र, जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सातत्याने पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध करून दिला. त्यामुळे काही महिन्यात हे काम पूर्णत्त्वास जाईल, असे वाटत असतानाच प्रदीप पी. यांची बदली झाली आहे.