रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:43 PM2018-06-27T17:43:13+5:302018-06-27T17:46:18+5:30
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.
पाली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाची सुरु असणारी कामे १५ जूनपर्यंत बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही पाली जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर, खानू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.
मुदत संपून दहा दिवस उलटले तरी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत कामे अत्यंत जोरात सुरु असल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या सुरू असलेल्या कामांमुळे सध्या पाऊस असल्याने महामार्गावर मातीचा चिखल, अवजड सामुग्री पोकलेनसारखी सध्याच्या वापरातील वाहने डांबरी रस्त्यावरुन नेली जात असल्याने अपघातांचा धोका वाढलेला आहे.
महामार्ग चौपदरीकरणातील आरवली ते वाकेड या विभागाचे कंत्राट एमईपी या कंपनीला देण्यात आलेले असून, या विभागातील काम कंपनीने सर्वांत उशिराने सुरु केलेले आहे. हे काम निर्धारित वेळेत सुरू केले असते तर आज ही वेळ आली नसती.
सध्या पालीनजीक जोयशीवाडी पेट्रोलपंप, उभदिव परिसर या भागामध्ये दिवस-रात्र पावसामध्ये अत्यंत वेगाने तीन पोकलेन मशिनने काम जोरात सुरु आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षिततेकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी महामार्गावर मातीचा चिखल येऊन रस्त्यावरुन वाहने घसरुन अपघाताचा धोका आहे. शिवाय रस्त्यावरुन पोकलेन सारखी अवजड मशिनरी चालवत नेल्याने रस्त्याला खड्डे पडत आहेत. यामुळे सध्या वापरातील डांबरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
चौपदरीकरणातील कामे पाली बाजारपेठ, देवतळे माळ, मराठेवाडी, या मानवी वस्तीनजीक सुरू आहेत. मशिनने रात्रभर कामे सुरु असल्याने त्याच्या आवाजाचा अनेक लोकांवर परिणाम होत आहे.
शिवाय कापडगाव ते मठपर्यंत रस्त्याच्या बाजू पट्ट्यांवर तोडलेल्या झाडांचे तुकडे तसेच असल्याचे बाजू पट्ट्याच राहिलेल्या नाहीत. बाजूपट्टी नाही. त्यामुळे पादचारी महामार्गावरुनच जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत आहेत. ही बाब त्यांच्यासाठी धोकादायक आहे. महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहेत.