रत्नागिरी : जग जाते आहे विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात : निरंजन वर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:58 PM2018-02-27T18:58:55+5:302018-02-27T18:58:55+5:30
पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा बोलत होते.
पावस : विज्ञानाच्या अनिर्बंध वापरामुळे सृष्टीचे संतुलन बिघडले आहे. जग या विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात सापडले आहे. अमेरिकेचे आकाश प्रदूषित झाल्याने तेथील एक चतुर्थांश जनसंख्या कारागृहात असते. नासाने भविष्यातील संकट ओळखून एका अस्थापनाला गोमयाधारीत हायड्रोजनसारख्या वायूंवर चालणाऱ्या संशोधनाचे कंत्राट दिले आहे. गोमय, मूत्र, दूध यामध्ये अत्यंत उपयोगी घटक आहेत. जगाला या विनाशातून केवळ गोमाताच वाचवू शकते, असे उद्गार पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी येथे काढले.
पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
या संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५० गव्यसिद्ध तसेच काही स्थानिक गोमाताप्रेमी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने तसेच राजीव दीक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील आमोद केळकर यांनी केले.
गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा पुढे म्हणाले की, आज देशात गव्यसिद्धांच्या सुमारे १०० गोशाळा आहेत. प्रत्येक गोशाळेची गोसंवर्धनाची मर्यादा आहे. त्या अतिरिक्त असणारी वासरे, गाई आपण गरजू गव्यसिद्धांना दान देऊन त्यांना उभे केले पाहिजे. गुरुकुलम इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय भाषेत शिक्षण देते. शासनाच्या काही अटीमुळे मात्र आपणाला गुरुकुलममध्ये प्रवेश १०+२ असा ठेवावा लागला आहे.
यावेळी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माने म्हणाले की, गाय-बैल जरी वृद्ध झाले तरी टाकाऊ नाहीत. ते शेवटपर्यंत आपल्याला सेवा देतात, असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले की, समाजात गोमातेविषयी जागृती होत आहे. परंतु त्याला दिशा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ते सिंधुदुर्गात शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले.
गोमाता वाचली पाहिजे
भारताची ताकद गाय आहे, ती नष्ट करण्याचे षडयंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवले गेले. यासाठी गोमासाला वाढीव मागणी मूल्य देणे संकरीकरणातून भारतीय गोवंश नष्ट केले. यासाठी गायींचे रक्षण आपणच केले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात असणाऱ्या कायद्यांच्या कार्यवाहीसाठी आपण शासनाला भाग पाडले पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले.