रत्नागिरी : यावर्षी हापूसचा हंगाम लांबणार, मोहोराचे प्रमाण अत्यल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:58 PM2018-11-05T13:58:51+5:302018-11-05T14:00:20+5:30
दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.
रत्नागिरी : दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे.
वास्तविक आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीस सुरूवात होते. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी सुरू झालेली नाही. शिवाय गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे.
यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला मात्र श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस नवरात्रातच लागला. त्यामुळे यावर्षी पालवीचे प्रमाण अधिक आहे. किनारपट्टीलगत बागायतीमध्ये मोहोराला प्रारंभ झाला असला तरी प्रमाण अत्यल्प आहे.
वास्तविक तापमानात बदल होणे अपेक्षित आहे. हवेत गारवा निर्माण होणे आवश्यक आहे. १६ अंश सेल्सियस पर्यत तापमान खाली आल्यावर मोहोर सुरू होतो. गेले दोन ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने ढगाळ वातावरण आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर्तीपासून थंडी सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तद्नंतर फुलोऱ्यास प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिलपासूनच आंबा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मोहोर चांगला येवून फळधारणेचे प्रमाण कमी होते. सुरूवातीला पिक कमी होते मात्र मे मध्ये एकाचवेळी आंबा बाजारात आल्याने दर कोसळले होते.
यावर्षी पावसाचे सरासरीपेक्षा प्रमाण कमी राहिले असतानाही झाडांना पालवीचे प्रमाण अधिक आहे. हवामानावर आधारित आंबा, काजू पिकासाठी फळपिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अवेळचा पाऊस, अवेळची थंडी, उच्चत्तम तापमान यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंबा पिक विमा योजना सुरू केली. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू आहे. परंतु या योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यामध्ये विमा योजनेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय यावर्षी अदयापही त्याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिले असून मोठ्या प्रमाणावरील पालवीमुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांनी कल्टारचा वापर देखील फारसा केलेला नाही. दिवाळीपासून थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होईल. शेतकऱ्यांकडून पालवीवर तुडतुडा प्रतिबंधात्मक किटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या फळपिक विमा योजनेचा परतावा अद्याप शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही. गतवर्षी आॅगस्टमध्ये परतावा जाहीर करीत परतावा रक्कम वितरण सुरू झाले होते. त्यामुळे परताव्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
- एम.एम गुरव,
शेतकरी