रत्नागिरी जिल्हा बँकेची लवेल केंद्रावरील परीक्षा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:33 PM2024-09-03T12:33:41+5:302024-09-03T12:34:15+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर दि. १ ते ४ ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर दि. १ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तीन सत्रांमध्ये घेतली जात आहे. परंतु, या चार परीक्षा केंद्रांपैकी फक्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मु. पो. लवेल, ता. खेड) या परीक्षा केंद्रावर नेटवर्कसंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १ ते ४ सप्टेंबर रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
या परीक्षा केंद्रावर नेटवर्कसंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १ आणि २ सप्टेंबर रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु, अद्याप या केंद्रावरील नेटवर्कची तांत्रिक अडचण शर्थीचे प्रयत्न करूनही दुसऱ्या दिवशीही दूर न झाल्याने १ ते ४ सप्टेंबर या चारही दिवसांमध्ये होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याबाबत या केंद्रावर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून ई-मेलद्वारे, मेसेजद्वारे कळविणेत आले आहे. तसेच पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात आले आहे.
ही रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्यासंबंधीची माहिती संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपूर्वी तीन ते चार दिवस आगाऊ मेसेज द्वारे, ई-मेलद्वारे तसेच वेबसाइटवर परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून कळविण्यात येणार आहे. उर्वरित इतर तीन केंद्रांवरील परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.