रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सात जागा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 04:30 PM2021-11-30T16:30:16+5:302021-11-30T16:32:06+5:30
लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटगणांची पुनर्रचना होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५५ ऐवजी ६२ गट होणार आहेत तर पंचायत समितीच्या ११० गणांऐवजी १२४ गण होणार आहेत.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीजिल्हा परिषदेत सात गट आणि पंचायत समित्यांचे १४ वाढणार आहेत.
याआधी जिल्हा परिषदेचे ५७ सदस्य होते. प्रत्येक गटाच्या लोकसंख्येच्या निकषात बदल झाल्यानंतर ही संख्या २ने कमी झाली आणि ५५ गट झाले. आता पुन्हा एकदा लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गटगणांची पुनर्रचना होणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे ५५ ऐवजी ६२ गट होणार आहेत तर पंचायत समितीच्या ११० गणांऐवजी १२४ गण होणार आहेत.
सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ इतकी आहे. यामध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जागा ५५वरून ६२ होतील.
सद्यस्थितीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मुळात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे आणि त्यातही जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.