रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्याही हाती झाडू
By admin | Published: November 12, 2014 09:15 PM2014-11-12T21:15:41+5:302014-11-12T23:31:32+5:30
स्वच्छता मोहीम : स्वच्छ भारत अभियानात प्रशासकीय अधिकारी सहभागी
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रङ्कमोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणी प्रक्रियेने रत्नागिरीत वेग घेतला असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्त्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आवारातील दुर्लक्षित परिसर तसेच स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सफाई करुन या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:ला वाहून घेण्याचा संदेश दिला.
रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि युद्धपातळीवर करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या अतिरिक्त वेळेत विशेष मोहीम राबवून आपापल्या कार्यालयांची स्वच्छता करीत आहेत. एवढेच नव्हे; तर वरिष्ठ अधिकारीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभाग घेऊ लागल्याने या मोहीमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वच्छता ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे, असा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून विशेषङ्कमोहीम राबवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली.
यावेळी मुख्य इमारत परिसरासह विविध कार्यालय इमारतींच्या मागील दुर्लक्षित भाग स्वच्छ करण्यात आला. आवारातील स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व आवश्यक तेथे स्वत: स्वच्छता केली. जिल्हा, तालुका, शहर आणि अगदी गावपातळीपर्यंत प्रत्येक कार्यालयात ही मोहीम राबविण्यात येत असून, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या अभियानात जिद्द आणि उत्साहाने सहभागी झाले आहेत.
‘स्वच्छ भारत अभियान’ ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे अभियान यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील या विशेष स्वच्छताङ्कमोहिमेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले, तहसीलदार मारुती कांबळे आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारीही सहभागी
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही अनेक ठिकाणी केली स्वच्छता.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, नियोजन अधिकारी यांच्यासह अनेक वर्ग-१च्या अधिकाऱ्यांचा समावेश.
स्वच्छ भारत अभियान ही नित्य आणि निरंतर चालणारी प्रक्रिया : राधाकृष्णन बी.
कार्यालयीन वेळेत कार्यालयेही होऊ लागली स्वच्छ.
स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यात वेग.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मोहीम सुरू.