त्यानं विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ अन् प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या

By मनोज मुळ्ये | Published: February 16, 2024 04:16 PM2024-02-16T16:16:34+5:302024-02-16T16:17:27+5:30

रत्नागिरी : ‘तो येणार.. शेवटच्या दिवशी तो येणार.. याचीच चर्चा गेले चार दिवस रंगली होती. अन् अखेर तो समारोपाला ...

Ratnagirikar danced with Avadhoot Gupte, concluding the Mahasanskrit Mahotsav | त्यानं विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ अन् प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या

त्यानं विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ अन् प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या

रत्नागिरी : ‘तो येणार.. शेवटच्या दिवशी तो येणार.. याचीच चर्चा गेले चार दिवस रंगली होती. अन् अखेर तो समारोपाला आला. त्यानं नेहमीच्या स्टाईलमध्ये विचारलं, ‘पाव्हणं जेवला काय..’ आणि रसिक प्रेक्षकांनी आपल्या खुर्च्या सोडल्या.. रंगमंचासमोर उत्स्फूर्तपणे नृत्य करत एकच कल्ला केला. रसिक प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलाला अवधूत गुप्तेनं आपल्या सादरीकरणाने जिंकलं होतं.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे आयाेजित महासंस्कृती महोत्सवाची ‘अवधूत गुप्ते संगीत रजनी’ या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते अवधूत गुप्तेचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोल्हापूर येथील ‘शिव स्वराज्य मर्दानी’ आखाड्याच्या मुलांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. तलवार चालवणे, भाला फिरवणे, दांडपट्टा चालवणे, लाठी फिरवणे, दांडपट्ट्याने लिंबू कापणे, लाठी फिरवता फिरवता नारळ फोडणे असे चित्तथरारक प्रदर्शन हलगी, घुमक आणि कैताळ या रणवाद्याच्या निनादात केले. त्यानंतर तोणदे येथील सिद्धिविनायक ग्रुपने पालखी नृत्य सादर करून वाहवा मिळविली. या नृत्यामध्ये मानवी मनोरा उभा करत, पालखी घेऊन रोमांचकारी नृत्य सादर केले.

कोकणची सुकन्या ईशानी पाटणकर हिच्या ‘गं पोरी नवरी आली..’ या गीताने ‘अवधूत गुप्ते संगीत रजनी’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगतदार सुरू असतानाच अवधूत ‘तूच माझी आई देवा.. तूच माझा बाबा..’ ही गणेश वंदना आपल्या नृत्य कलाकारांसह घेऊन रंगमंचावर अवतरला. ‘तुझे देख के ए मधुबाला,’ ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला,’ या रिमिक्स गीताने उपस्थितांना भुरळ पाडली.

‘कभी गहरें समुंदर की गहराईयाँ’ असे म्हणत कोकणची महती, इथले पर्यटन, इथली समृद्धता आणि त्याच्यामधून बहरत जाणारे प्रेम हा हळुवार धागा पकडत, रसिक प्रेक्षकांच्या अंतर्मनाला स्पर्श केला. यावेळी अनेकांनी रंगमंचाजवळ येऊन सेल्फीसह अवधूत गुप्तेला माेबाइलमध्ये बंदिस्त केले. त्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Web Title: Ratnagirikar danced with Avadhoot Gupte, concluding the Mahasanskrit Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.