परप्रांतीय विक्रेत्यांनी रत्नागिरीकरांना गादीतही फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:15 PM2021-02-23T12:15:26+5:302021-02-23T12:18:28+5:30
fraud Crimenews Ratnagiri- झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाद्या चक्क थर्माकोलच्या असल्याचे उघड होताच अनेकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या विक्रेत्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रत्नागिरी शहरात तब्बल ४० जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या सर्वांनी पोलीस स्थानक गाठल्यावर त्यांना पैसे परत करण्यात आले.
रत्नागिरी : शहरात टेम्पो घेऊन विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने नागरिकही वस्तू खरेदीसाठी गर्दी करतात. याचाच फायदा उठवत सोमवारी रत्नागिरी शहरात गाद्या विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या.
झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाद्या चक्क थर्माकोलच्या असल्याचे उघड होताच अनेकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या विक्रेत्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रत्नागिरी शहरात तब्बल ४० जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या सर्वांनी पोलीस स्थानक गाठल्यावर त्यांना पैसे परत करण्यात आले.
झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट गाद्या घेऊन उत्तर प्रदेशवरून काही विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी झोपायच्या गाद्यांची किंमत दहा ते बारा हजार रुपये सांगितली. त्यानंतर तडजोड करून त्यातील गाद्या कमी किमतीत विकल्या. अनेकांनी या गाद्या विकतही घेतल्या. शहरात या गाद्यांची विक्री करत असताना काही जागरूक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी यातील काही गाद्या उघडून बघितल्या असता त्यामध्ये केवळ थर्माकोल आढळला. त्यामुळे हे विक्रेते नागरिकांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आले.
पैसे घेतले परत
नागरिकांनी या विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या गाद्या खरेदी करून अनेकजण फसले गेले होते. दरम्यान काहीजणांनी या गाद्या परत करून आपले पैसे परत घेतले. याबाबत पोलीस संबंधितांकडून माहिती घेत असून, उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.