रत्नागिरीच्या ‘जाणीव’ने पेटवल्या स्नेहाच्या ‘लक्ष’ ज्योती!
By Admin | Published: February 25, 2015 10:58 PM2015-02-25T22:58:04+5:302015-02-26T00:10:39+5:30
रसिक मंत्रमुग्ध : अंध विद्यार्थ्यांच्या गोड गळ्यांना टाळ्यांची दाद
रत्नागिरी : दृष्टी नसली म्हणून काय झाले, गोड गळ्यांनी उत्कृष्ट व एकापेक्षा एक सुंदर गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘स्नेहज्योती’च्या कलाकारांसाठी ‘जाणीव’ने स्नेहाच्या लक्ष लक्ष ज्योती पेटवल्या. ‘जाणीव’ संस्थेने तिकीट विक्रीतून मिळालेल्या रकमेचा एक लाखाचा धनादेश शिवाय विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेले रोख ६५ हजार रूपये देखील स्नेहज्योतीच्या प्रतिभा सेनगुप्ता व आशा कामत यांच्याकडे सादर केले.‘जाणीव’ संस्थेतर्फे सावरकर नाट्यगृह येथे स्नेह ज्योतीच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष महेश गर्दे यांनी तीन वर्षानंतर पुन्हा एकदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. स्नेहज्योतीचे काकडे सर यांनी कार्यक्रमाची सुरूवात ‘ओंकार स्वरूपा ...’ गीताने केली. त्यानंतर संजना हिने सं. मत्सगंधा नाटकातील ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’ सादर केले. त्यानंतर केशव मालोरे याने ‘नाम घेता मुखी राघवाचे...दास रामाचा हनुमंत नाचे’ भक्तीगीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर काकडे सर यांनी ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली..’ लोकगीत उत्कृष्टरित्या सादर केले.आशिष याने ‘ए मेरी जोहराजबी..’ गाण्याचे बहारदार सादरीकरण केले. ‘चांदण चांदण झाली रात एकवीरेची पहात होते वाट..’ या कोळीगीताच्या सुंदर सादरीकरणावेळी प्रेक्षकवर्गानेही टाळ्यांची साथ दिली. मनीष पवार यानेही ‘मधुबन में राधिका नाचे रे...’ गीत सादर केले. आशिका व आशिष यांनी ‘या कोळी वाड्याची शान, आई तुझ देऊळ...’ कोळीगीत सादर करून प्रेक्षकांमध्ये धमाल उडवून दिली.कांचना नाडकर हिने तर ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ लावणी सादर केली. काकडे सर यांनी ‘स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला..’ सादर केले. केशव मालोजी याने ‘लुंगी डान्स लुंगी डान्स’ हे हिंदी गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. दरम्यान अमर गोवेकर याने ‘ये गो ये ये मैना..’ या गीतावर नृत्य सादर केले. मनिष पवार याने ‘जय जय महाराष्ट्र माझा...’ या गीताने कार्यक्रमाची सांगता केली. (प्रतिनिधी)
आम्हाला भीक नको, सहानुभूतीही नको. रोजगार द्या. रोजगाराला श्रमाची जोड असेल, तर कोणतीही व्यक्ती प्रगती करू शकते, असे सांगून महाबळेश्वर येथील सनराईज कॅडल उद्योग समूहाचे भावेश भाटिया यांनी आपला जीवनपट उलगडला. अंध असूनही स्वत:च्या बळावर सुरू केलेल्या मेणबत्ती व्यवसायाने भरारी घेतली आहे. शेकडो अंध बांधवांना त्यांनी या व्यवसायात सामावून घेत रोजगार दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे डिसेंबर २०१४ मध्ये राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले. खेळाची आवड असल्याने आपण अनेक पदके मिळवली आहेत. ब्राझील येथे होणाऱ्या आॅलंपिक २०१६ मध्ये यश मिळवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. आपल्या यशामागे पत्नीचा वाटा महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमातंर्गत सारेगम फेम प्रसिध्द ढोलवादक नीलेश परब यांनी उत्कृष्टरित्या ढोलकी वादक सादर केले. सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू यांची व परब यांची संगीताची जुगलबंदी चांगलीच रंगली. कार्यक्रमासाठी अॅक्टोपॅडसाथ वैभव फणसळकर, बासगिटारसाथ शैलेश गोवेकर, ढोलकी मिलिंद लिंगायत, ढोल साथ गणेश घाणेकर यांनी केली. सूत्रसंचलन सुशील जाधव यांनी केले.