रत्नागिरीचे दातृत्व सर्वदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:42+5:302021-07-28T04:33:42+5:30
मात्र, या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात येथील सामाजिक संस्थांनी त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. दोन वर्षांपूर्वी ...
मात्र, या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात येथील सामाजिक संस्थांनी त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. दोन वर्षांपूर्वी सांगली येथे असेच महापुराने थैमान घातले हाेते. अशावेळीही रत्नागिरीतील सुमारे ३० संस्थांनी एकत्र येत हेल्पिंग हॅंड फोरम तयार केला आणि त्या माध्यमातून सांगलीसाठी सुमारे ९ ट्रकमधून सर्व जीवनावश्यक वस्तूंची मदत या जिल्ह्यात पोहोच केली होती. आपत्ती काळासाठी एकत्र आलेल्या या सर्व संस्थांनी आपली एकी कायम राखण्याचे शिवधनुष्य आतापर्यंत यशस्वी पेलले आहे.
दोन-तीन संस्था एकत्र येऊन काम करायचे म्हटले तरी कुणाच्या नेतृत्वाखाली करायचे, हा मोठा ‘इगो’ संस्थांमध्ये निर्माण होतो. परंतु, रत्नागिरी आणि परिसरातून एकत्र आलेल्या या ३० सामाजिक संस्थांना गेल्या दोन वर्षांत हा अहंकार कधी शिवलाच नाही, ही अभिमानाची गोष्ट समस्त रत्नागिरीकरांसाठीच समजायला हवी. आपत्ती आली की धावत पुढे जायचे आणि आपत्तीग्रस्तांना त्यातून बाहेर काढायचे, हेच कर्तव्य गेली दोन वर्षे हे सर्व स्वयंसेवक तन, मन, धनाने करीत आहेत आणि उदार मनाने दातेही पुढे येत आहेत. या विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी आपल्याच चिपळूणवासीयांसाठी तेवढ्याच ताकदीने पुढे होऊन दात्यांच्या सहकार्याने मदतीचा डोंगर उभा करण्यास सुरुवात केली. कोकणातील दातृत्वाचे हेच मुख्य वैशिष्ट्य मानायला हवे.