राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरीची ‘पॉवरबाज’ प्रतीक्षा
By admin | Published: January 28, 2016 12:02 AM2016-01-28T00:02:28+5:302016-01-28T00:21:29+5:30
स्केटिंग शिकत असतानाच पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला.
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी
स्केटिंग शिकत असतानाच पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक्षा साळवी हिने यश संपादन केले. पॉवरलिफ्टिंगबरोबर हॅण्डबॉल, बास्केटबॉल, तलवारबाजी स्पर्धेतही नैपुण्य मिळविले आहे. भविष्यात महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय असून, आपण ते पूर्ण करणार असल्याचे प्रतीक्षा हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असतानाच शाळेच्या खो-खो संघात प्रतीक्षा खेळत होती. मात्र, सातवीची परीक्षा पास झाल्यानंतर तिने स्केटिंगचे प्रशिक्षण सुरू केले. त्याचवेळी पॉवरलिफ्टिंगचा सराव करणाऱ्या खेळाडूंकडे पाहून आपणही असे काही तरी वेगळे शिकावे, अशी इच्छा निर्माण झाली व तिने पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. परंतु मध्यंतरी काही वर्षे त्यात खंड पडला होता. त्या कालावधीत तिने हॅण्डबॉल, बास्केट बॉल, तलवारबाजी याचे कौशल्य संपादन केले. बारावी पास झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रतीक्षाने पॉवरलिफ्टिंग सराव सुरू केला. सध्या ती नवनिर्माण महाविद्यालयात बॅचलर आॅफ मॅनेजमेंट स्टडीच्या प्रथम वर्षात शिकत आहे. शैक्षणिक गुणवत्ता मिळवून पोलीस प्रशासनात सेवा करण्याची तिची इच्छा आहे.
प्रतीक्षाचे बाबा निवृत्त सैनिक असून, आई शिक्षिका आहे. मात्र, दोघांचाही प्रतीक्षाला भरपूर पाठिंबा आहे. वर्षभरात प्रतीक्षाने दोन राष्ट्रीय व एक राज्यस्तरीय स्पर्धा खेळून यश मिळवले आहे. हॅण्डबॉल, तलवारबाजीमध्येही तिने विजय मिळविला असला तरी भविष्यात पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, कॉमनवेल्थ, आॅलिंम्पिक खेळणार असल्याचे सांगितले.
सकाळी ८ ते १२ कॉलेज झाल्यावर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सलग पाच तास सराव करते. रविवारी सरावाला सुटी असली तरी स्पर्धेच्या वेळी मात्र सुटीच्या दिवशीही सराव सुरू असतो. सराव करून रात्री घरी आल्यानंतर ती महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करते. दिवसभर तिचे व्यस्त शेड्युल असले तरी कंटाळा न करता मनापासून सराव करते.
तिने विविध खेळात बक्षिसे मिळवली तरी तिचा पॉवरलिफ्टिंगकडे तिचा ओढा अधिक आहे.
यश रत्नकन्यांचे
जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका
राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश
इंदौर (मध्यप्रदेश) सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
सोनिपत (हरियाणा) ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश
वाशिम येथे झालेल्या सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
पायका शालेय हॅण्डबॉल स्पर्धेत रौप्यपदक.
वरिष्ठ महिला हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक.
सबज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत सहभाग.
स्पर्धेसाठी निवड
मुंबई विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड.
चंद्रपूर येथे २८ ते ३० जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.