रत्नकन्या श्रुतिकाची अन्न व कृषी संघटना नेटवर्क समन्वयकपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:46 PM2020-12-22T17:46:59+5:302020-12-22T17:53:53+5:30
FishFood Ratnagiri News- युनायटेड नेशन्स स्थापित अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून रत्नकन्या श्रुतिका श्रीधर सावंत हिची निवड झाली आहे.
रत्नागिरी : युनायटेड नेशन्स स्थापित अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून रत्नकन्या श्रुतिका श्रीधर सावंत हिची निवड झाली आहे.
सेक्रेड हार्ट कान्व्हेंट स्कूल, उद्यमनगर येथे श्रुतिकाने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने शिरगाव मत्स्य महाविद्यालयात फिशरीज इंजिनिअर पदविका घेतली. फिशरीज ऑफ सायन्स विषयात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अक्वॉकल्चर विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी थायलंड येथील वर्ल्ड रॅकिंग कॉलेज एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने दीड वर्षे माशांचे प्रकार व त्यांचे खाद्य या विषयावर संशोधन केले.
माशांचे खाद्य तयार करण्यासाठी मासे न वापरता निसर्गातील कीडे व अन्य घटकांचा वापर केला जाऊ शकतो का? या खाद्यामुळे माशांच्या वाढीवर काय परिणाम होतो, त्यांचा दर्जा तपासला असता सकारात्मक परिणाम दिसून आले. तिच्या संशोधनाची दखल थायलंडमधील कंपन्यांनी घेतली.
श्रुतिकाचे वडील एस. टी.च्या विभागीय कार्यशाळेत वरिष्ठ मेकॅनिकल, तर आई कृ. चि. आगाशे शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. श्रुतिकाचा लहान भाऊ मायक्रो बॉयोलॉजी विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अॅक्वॉकल्चर आणि अॅॅक्वाटिक रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत असताना श्रुतिकाने विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता.
संशोधनाबरोबरच तिने प्रशिक्षण कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते. माशांसाठी अन्न तयार करण्यासाठी माशांऐवजी निसर्गातील घटकांचा वापर केला जातो व त्यामुळे माशांची वाढ चांगली होते, शिवाय दर्जाही चांगला राहतो, याबाबतचे तिने केलेले संशोधन व प्राप्त सकारात्मक परिणाम याची दखल घेण्यात आली. त्यामुळेच श्रुतिकाला जागतिक स्तरावर नेटवर्क समन्वयक म्हणून काम करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे.
अनेक संशोधन प्रकल्प
थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अॅक्वॉकल्चर आणि अॅॅक्वाटिक रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत असताना श्रुतिकाने विविध संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता. संशोधनाबरोबरच तिने प्रशिक्षण कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले होते.