राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना?, मंत्री उदय सामंतांचा मिश्लिक प्रश्न
By मनोज मुळ्ये | Published: April 1, 2023 02:33 PM2023-04-01T14:33:06+5:302023-04-01T14:33:31+5:30
राऊत म्हणजे नेमके कोण?
रत्नागिरी : राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना, असा मिश्लिक प्रश्न विचारत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला हाणला.
आपल्याला आलेल्या धमक्या राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही तर त्याची चेष्टा करत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. त्याबाबत रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, असे बोलून राऊत जनतेची चेष्टा करत आहेत. अर्थात राऊत म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न त्यांनी केला. संजय राऊत यांचे नाव घेतले जाताच, राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना? मग ठीक आहे, असा टोला त्यांनी मिश्किलपणे हाणला.
"दिल्लीत भेट, तुला एके ४७ ने उडवतो''
"तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची धमकी संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून व्हॉट्सॲपद्वारे मिळाली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर, विरोधक अन् सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रीयाही उमटू लागल्या आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा
या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करताना सांगितले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले.