‘खंबाटा’चे कोकणातील कर्मचारी करणार राऊत यांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:39 AM2019-04-01T00:39:00+5:302019-04-01T00:39:06+5:30
रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार ...
रत्नागिरी : अडीच वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनी संगनमताने रातोरात बंद करून या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी २७६३ कामगारांना देशोधडीला लावले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही विनायक राऊत यांच्या संस्थेला खंबाटा एव्हिएशनकडून थेटपणे एक मोठ्या रकमेचा धनादेश मिळाला होता, असा आरोप केला होता. या कंपनीचे ६० टक्के कामगार हे कोकणातील असून ते गावोगावी जाऊन खासदार राऊत यांचा खरा चेहरा मतदारांसमोर ठेवणार आहेत. राऊत यांना त्यांच्या प्रश्नांची उतरे द्यावीच लागतील, असे स्वाभिमानचे रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवार नीलेश राणे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी नीलेश राणे याच्यासोबत उपस्थित खंबाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. कंपनीचे कर्मचारी सुनील तळेकर म्हणाले की, कंपनी अडीच वर्षांपूर्वी बंद पडूनही कामगारांचे सहा महिन्यांचे पगार, भविष्य निर्वाह निधी, लिव्ह एन्कॅशमेंट व अन्य फायदे अजूनही मिळालेले नाहीत. त्यातील अनेक कामगारांनी गेल्या अडीच वर्षात आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. या सर्व स्थितीला विनायक राऊत हे जबाबदार आहेत. असे असतानाही त्यांनाच रत्नागिरी मतदारसंघातून सेना पक्षप्रमुखांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. राऊत यांच्या भ्रष्टाचाराचे ठाकरे यांनी समर्थनच केले आहे, असा आरोप सुनील तळेकर यांनी केला आहे. राऊत यांनी कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत त्याच जागेत बडस एव्हिएशन कंपनी येण्यास मदत केली, असे तळेकर म्हणाले.
कर्मचारी विश्वनाथ दळवी म्हणाले, खंबाटा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर अवलंबून ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे. कंपनी २०१६ला बंद झाली, त्यामागील खरा सूत्रधार विनायक राऊत हेच आहेत. खंबाटाचे पूर्ण युनिट राऊत हे पाहात होते. कर्मचाºयांच्या येणे असलेल्या रकमेबाबत राऊत यांनी आजपर्यंत आम्हाला उत्तर दिलेले नाही, असे दळवी म्हणाले.
राऊत यांना यावेळी मत मागण्याचा अधिकारच नाही. त्यांना घरी उभेही करू नका, असे आम्ही सर्व कर्मचारी मतदारांना आवाहन करणार आहोत. ज्या ज्यावेळी आम्ही राऊत, पक्षप्रमुख ठाकरे यांना भेटलो त्या त्यावेळी पाहतो, करतो, असे सांगून आजपर्यंत काहीच केलेले नाही. भेट नाकारणे, उडवाउडवी सुरूच आहे. कामगारांबाबत राऊत व सेनेला सोयरसूतक नाही. त्यामुळे या प्रकरणी राऊत यांच्याबरोबर पक्षप्रमुख ठाकरे हेसुध्दा गुन्हेगार आहेत, असा आरोप दळवी यांनी केला.