रत्नागिरी जिल्ह्यातील धान्य दुकानांची रवींद्र चव्हाण करणार पाहणी
By admin | Published: July 15, 2017 02:52 PM2017-07-15T14:52:14+5:302017-07-15T14:52:14+5:30
दापोलीत आढावा बैठक : लोकाभिमुख कामे करण्याच्या सूचना
आॅनलाईन लोकमत
दापोली (जि. रत्नागिरी), दि. १५ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी भरलेल्या करातूनच राज्याचा कारभार चालवला जात असून, शासकीय यंत्रणा ही सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यास बांधिल असून, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोलीतील आढावा बैठकीत बोलताना केले.
दापोली, खेड व मंडणगडातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली येथे घेतली. या आढावा बैठकीत पुरवठा विभागाचा आढावा घेताना रेशन दुकानांसंदर्भात जनतेच्या किती तक्रारी अद्याप आपल्यापर्यंत आल्या आहेत, असे चव्हाण यांनी विचारले असता, तीनही तालुक्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रारी नसल्याचे सांगितले. रेशन दुकानदारांकडून सर्व नियमांचे पालन होते का, अशी विचारणाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. यावर रेशन दुकानांसंदर्भात एकही तक्रार नाही, असे सांगितले. यावर चव्हाण यांनी अशा दुकानांची पाहणी आपण पुढील भेटीत करु, असे सांगितले.
टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्याबाबत काय उपाययोजना केल्या असे चव्हाण यांनी विचारले असता, अधिकाऱ्यांनी या गावांमध्ये तळी खोदण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितल्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पावसाळ्यात तळी खोदणार का? असे विचारले. यावेळी चव्हाण म्हणाले की, सर्वसामान्यांच्या कराचा पैसा विकासकामांसाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा विनियोग योग्यठिकाणी होतो की नाही, यावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार बाळ माने, जिल्हा सरचिटणीस केदार साठे, शशिकांत चव्हाण, सचिन थोरे, दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव, मंडणगड व खेड तहसीलदार, पुरवठा अधिकारी, बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, पोलीस निरीक्षक अनिल लाड उपस्थित होते.