रवींद्र साळुंखे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:20+5:302021-07-16T04:22:20+5:30
रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे ...
रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे यांचे गुरुवार, १५ जुलै रोजी सकाळी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
कोरोना आजारातून बरे होत असतानाच रवींद्र साळुंखे यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरीच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी आपल्याला सोडून गेल्याची भावना आज रत्नागिरीतील नाट्यकर्मींमध्ये आहे. संकल्प कला मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांतून उत्कृष्ट अभिनय केला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनेक नाटकांच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता, तसेच कामगार, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना नाटकांतल्या भूमिकांसाठी पारितोषिकेही मिळाली होती. नाटकांबरोबर डॉर्ट फिल्म निर्मितीमध्येही त्यांनी पदार्पण केले होते. कलेबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातू, असा परिवार आहे.