रांगव धरण परिसरातील खैराची पुन्हा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:29 AM2021-03-28T04:29:40+5:302021-03-28T04:29:40+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या रांगव धरण परिसरातील खैराची पुन्हा एकदा अज्ञाताकडून चोरी झाली असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले ...
आरवली :
संगमेश्वर तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या रांगव धरण परिसरातील खैराची पुन्हा एकदा अज्ञाताकडून चोरी झाली असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत संगमेश्वर तालुका वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात खैराची तोड झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. मात्र, त्यावेळी केवळ कारवाईचा फार्स करत हे प्रकरण दडपण्यात आले, तर पाटबंधारे खात्याने आपले हात लगेचच वर केले होते. त्यामुळेच या खैर चोरी करणाऱ्यांना सरकारी अभय मिळाल्याची चर्चा होत आहे.
संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याचे यापूर्वी अनेकवेळा उघडकीस आले आहे. त्यावेळी वन विभागाकडून नाममात्र कारवाई करत प्रकरण दडपण्यात आल्याचे बोलले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातून रात्री लगतच्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात खैराची वाहतूक सुरू आहे. वाहतुकीचा कोणतीही वैध कागदपत्रे नसताना तोडलेला लाकूड साठा राजरोसपणे वाहतूक केला जात आहे.
याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता वाहतूक परवाना मिळेपर्यंत लाकूड साठा चोरी होऊ शकतो म्हणून तो हलवला जातो, असे उत्तर देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा प्रकरणातून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रशचिन्ह निर्माण होत आहे.
काही महिन्यांपूर्वी रांगव धरणाच्या भिंतीवरील पिचिंग खोदून खैराची चोरी झाल्याचे समोर आले होते. मात्र, धरणाचा सुरक्षेला धोका निर्माण करणारे प्रकरण गंभीर असतानाही लघुपाटबंधारे विभागाने हे धरण अजून ठेकेदाराच्याच ताब्यात असल्याचे सांगत आपले हात झटकले होते, तर वन विभागाने नाममात्र दंड आकारून या प्रकरणावर पडदा टाकला होता.
दोन दिवसांपूर्वी पुन्हा याच धरण परिसरातील खैराची चोरी झाली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. मात्र, ज्या जागेतून खैर चोरी झाले आहेत त्या जागेचे सातबारा व इतर कागदपत्रांसह तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. इतरवेळी या परिसरात येरझाऱ्या मारणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची तसदीही न घेतल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. वन विभाग व लघुपाटबंधारे विभाग दुर्लक्ष
करत असल्याने ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतला आहे.
.....................
पाटबंधारे सक्षम
ते खैर लघुपाटबंधारे विभागाच्या हद्दीत असतील तर तेथे कारवाई करण्याचा वन विभागाला कोणताही अधिकार नसून लघुपाटबंधारे विभाग त्यासाठी सक्षम आहे. याबाबत आपणही लघुपाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून तक्रारदारांनी लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क करावा, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे वनपाल सुरेश उपरे यांनी सांगतिले.