चिपळूण परिसरात सव्वादोनशेहून अधिक पक्ष्यांचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:40+5:302021-06-20T04:21:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूण परिसरात बहुसंख्य दुर्मीळ व स्थलांतरितांसह सुमारे सव्वादोनशेहून अधिक पक्ष्यांचे वास्तव्य असल्याची भूमिका पक्षी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चिपळूण परिसरात बहुसंख्य दुर्मीळ व स्थलांतरितांसह सुमारे सव्वादोनशेहून अधिक पक्ष्यांचे वास्तव्य असल्याची भूमिका पक्षी अभ्यासकांनी मांडली. वन विभाग आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्त्वाच्या नोंदी या विषयावरील महत्त्वपूर्ण परिसंवाद घेण्यात आले. यावेळी ही माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना बापट यांनी चिपळूणला चारही बाजूंना डोंगर असल्याने अनेकदा डोंगर माथ्यावरती दिसणारे जैवविविधतेच्या साखळीतील घटक मोठ्या पाण्याच्या प्रवाहासोबत इथल्या खाडीत दिसत असल्याचे म्हटले. आज चिपळूण परिसरात सिमेंटचे जंगल वाढत आहे. हे चित्र बदलून निसर्ग टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. पक्ष्यांच्या जवळपास १३०० जाती भारतात, त्यातल्या ६५० जाती महाराष्ट्रात, तर चिपळूणच्या आसपास २३० प्रकारचे पक्षी बघायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. चिपळुणात ईगल, हॉर्नबिलसारख्या (ककणेर) वर्षानुवर्षे एकत्र जोडीने राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये गर्भधारणा (ब्रिडिंग) करावी की नाही, अशी मानसिकता निर्माण झाल्याचे, त्यांना प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध रोगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. काही स्थलांतरित पक्षी कोकणात न येता थेट घाटमाथ्यावरून कर्नाटककडे रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. श्रीधर जोशी यांनी पक्ष्यांबद्दलच्या गमतीजमती, त्यांचे वागणे, बदलत्या वातावरणात पक्ष्यांच्या विशिष्ट हालचालींसंदर्भात सादरीकरण केले. सात प्रकारचे हेरॉन चिपळूण परिसरात सापडतात तर युरेशियन रायानिक हा पक्षी चिपळुणात पहिल्यांदा दिसल्याची दुर्मीळ नोंद त्यांनी सांगितली. निसर्ग डायरी कशी लिहायची, यावर बोलताना प्रा. डॉ. हरिदास बाबर यांनी पक्षी व प्राण्यांना कॅलेंडर समजत असल्याचे म्हटले. या नोंदी करताना भागाचे नाव, तारीख, वेळ, तिथले हवामान, तापमान, अधिवास आदी नोंदी कशा करायच्या, हे सांगितले. यावेळी आव्हानात्मक वन्यजीव फोटोग्राफी हा तंत्रज्ञान व कलेचा संगम असल्याचे छायाचित्रकार नयनीश गुढेकर यांनी म्हटले. त्यांनी फाल्कन या दुर्मीळ पक्ष्याचा फोटो मिळवण्यासाठी केलेली ५ वर्षांची मेहनत सर्वांना सांगितली. या परिसंवादामध्ये राज्याच्या विविध भागातील निसर्गप्रेमी, पक्षी अभ्यासकांसह काही परदेशातील अभ्यासक सहभागी झाले होते. आमदार शेखर निकम यांनी या परिसंवादाला शुभेच्छा देताना हा परिसंवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले. परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर यांनी प्रास्ताविक केले. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा परिसंवाद झाला.