ई-पाससाठी बहुतेकांकडून रुग्णालयाचेच कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:02+5:302021-05-06T04:34:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, हेच कारण बहुतांश अर्जांमध्ये नमूद असून, त्याची शहानिशा करूनच परवानगी दिली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गावी जाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात जाण्यासाठी २३ एप्रिल ते ४ मे पर्यंत पोलीस खात्याकडे ७५०० पास आले. त्यातले ५०२ पास मंजूर झाले, तर ७२८४ इतके पास नामंजूर केले, तर अजून ११ पास प्रलंबित आहेत.
ई-पाससाठी कसा करावा अर्ज
ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते जिल्हा पोलीस विभाग निवडावा.
त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभाचे ठिकाण ते अंतिम प्रवासाचे ठिकाण व सोबत असलेल्या प्रवाशांची संख्या व माहिती.
ही कागदपत्रे हवीत
लग्नकार्य असेल, तर लग्नपत्रिका, शासनाने दिलेल्या परवानगीची प्रत, कोरोना चाचणी अहवालची प्रत (ॲन्टिजेन किंवा आरटीपीसीआर), हाॅस्पिटलचे काम असेल, तर त्याची कागदपत्रे, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या आधारकार्डची प्रत ही कागादपत्रे जोडावी लागतात. जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा मृत्यूचा दाखल्याची प्रत, नोकरीला रुजू व्हायचे असेल, तर त्याच्या जाॅयनिंग लेटरची प्रत आवश्यक.
२४ तासांत ई-पासला परवानगी
ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाते. पोलीस मुख्यालयामार्फत त्या अर्जाची तसेच जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवासाच्या तारखेपर्यंत २४ तासांत मंजुरी दिली जाते. पण मेडिकल इर्मजन्सी असेल, तर १ तासातही पास मंजूर केला जातो.
नाकाबंदी ठिकाणी ई-पासची चौकशी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्ट ठिकाणी ई-पास शिवाय जिल्ह्यात यायला व जिल्ह्यातून बाहेर जायला परवानगी नाही. नाकाबंदी ठिकाणी प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जात आहे.