जिल्हा परिषदेला बदल्यांचे आदेश प्राप्त
By admin | Published: April 24, 2016 10:03 PM2016-04-24T22:03:05+5:302016-04-24T23:24:58+5:30
आला हंगाम : जिल्हास्तरावरील बदल्या १५ मेपर्यंत
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक यांच्या बदल्यांचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरावरील बदल्या १५ मेपर्यंत, तर तालुकास्तरावरील बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत करण्यात येणार आहेत.
काही कर्मचारी व शिक्षक एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असल्याने त्यांनी मक्तेदारी निर्माण केली होती. त्यामुळे शासनानेही मागील तीन वर्षांपासून ही मक्तेदारी मोडीत काढल्याने अनेकांना एका तालुक्यातून अन्य तालुक्यामध्ये जावे लागले. शिक्षकांच्या बदल्या स्थगित करण्यासाठी वर्षभरापूर्वी काही शिक्षक संघटनांनी पुढाकारही घेतला होता.
विशिष्ट शाळेवर आपल्यालाच बदली मिळावी, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दरबारी धाव घेतली होती. त्यासाठी आर्थिक व्यवहारही झाल्याची चर्चा परिषद भवनात सुरु होती. त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट आयुक्त कार्यालयाकडून बदल्यांचा चेंडू जिल्हा परिषदेकडे टोलवण्यात आल्याने अनेकांची निराशा झाली. त्याचबरोबर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नियमानुसार बदल्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो देशभ्रतार यांनी झुगारुन लावला होता. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर बदल्यांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. जिल्हास्तरावरून ५ ते १५ मे आणि गट स्तरावरून १६ ते २५ मे या कालावधीत बदलीची प्रक्रिया समुपदेशाने पार पाडली जाणार आहे. १५ मे २०१४च्या तरतुदीनुसार बदल्यांची तरतूद करण्याच्या कार्र्यवाहीच्या सूचना शासनाने शुक्रवारी निर्गमित केल्या.
प्रशासकीय बदल्या १० टक्के आणि १० टक्के विनंती बदल्या करण्यात येणार असून, त्यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या ५ टक्के विनंती बदल्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या पंचायत समिती क्षेत्रांतर्गत प्रशासकीय बदल्या १० टक्के आणि विनंती बदल्या ५ टक्के करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अंतिम दीर्घ वास्तव्य सेवाज्येष्ठता यादी २ मे रोजी प्रसिध्द करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
शासनाने बदल्यांचे आदेश काढल्याची बातमी शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. तसेच जिल्हा परिषद प्रशासनही यासाठी सोमवारपासून कामाला लागणार आहे. या बदल्यांच्या कालावधीमध्ये परिषद भवनातही पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसणार आहे. (शहर वार्ताहर)