चार लाखाच्या कर्जापोटी २२ लाखाची वसूली, चिपळुणातील पिडीत तरूणीचा आत्मदहनाचा इशारा
By संदीप बांद्रे | Published: January 23, 2024 05:56 PM2024-01-23T17:56:48+5:302024-01-23T17:57:23+5:30
चिपळूण : व्यवसायासाठी तीन लाख नव्वद हजार रूपयांचे दोन टप्प्यात घेतलेले कर्ज फेडताना अनधिकृत सावकाराने २२ लाखाची वसुली केल्याचा ...
चिपळूण : व्यवसायासाठी तीन लाख नव्वद हजार रूपयांचे दोन टप्प्यात घेतलेले कर्ज फेडताना अनधिकृत सावकाराने २२ लाखाची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अटक व जामिनावर सुटका झाली असली तरी पोलिसांकडून ठोस कारवाई अथवा चौकशी केली जात नाही. त्यामुळे आपल्याला न्याय न मिळाल्यास पोलिस स्थानकासमोर २६ जानेवारीस उपोषण अथवा आत्मदहन सारखी भूमिका घ्यावी लाागेल, असे अलोरे येथील पिडीत तरूणी उज्मा सिद्दीक मुल्लाजी हिने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत उज्मा मुल्लाजी हिने अधिक माहिती देताना सांगितले की, वेलनेस सेंटरच्या दुकानात खरेदीसाठी नेहमी येणाऱ्या परविन शोहेब मुलानी ( अलोरे) हिने आपल्या दुकानातील साहित्य आणण्यासाठी स्वतःहून ९० हजार रूपयांची मदत केली. परंतू चारच दिवसात हि रक्कम तिने पुन्हा मागण्यास सुरवात केली. पतीला समजल्यामुळे मी दागिणे गहाण ठेवून सावकाराकडे कर्ज काढले आहे. तेव्हा ९० हजार रूपये व्याजासहित लवकरात लवकर दे असा तगादा लावला. दुकानातील साहित्याची ऑर्डर दिली होती, पण साहित्य आलेले नव्हते. मुळात आधीच ९० हजार रूपयांसाठी ६ महिन्यांची मुदत मागितली होती. त्याप्रमाणे तिला प्रति महिना २० हजार रक्कम तीन चार महिने अदा केली. परंतू चक्रीव्याजाप्रमाणे कर्जाच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यातून बाहेर पडण्यासाठी परविन मुलानी हिने सावकारी कर्जाचा पर्याय दिला.
खेर्डी येथील इकबाल गनी खेरटकर याचेकडून ३ लाखाचे कर्ज दिले. त्यानंतर या ३ लाख ९० हजार रूपयाच्या कर्जापोटी वारंवार त्यांना रोखीने तसेच बँकेद्वारे टप्प्या टप्प्याने पैसे दिले. त्याचवेळी या दोघांनी २५ लाखाच्या कर्जाचे अमिष दाखवून ५ लाख रूपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे घरच्यांचे व नातेवाईकांचे दागिणे गहाण ठेवून ५ लाख रूपये इकबाल खेरटकर याच्याकडे जमा केले. मात्र ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी नव्याने कर्ज दिले नाही. त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी मोबाईल नंबर ब्लॉक केला. इकबाल खेरटकर याने शहरातील मार्कंडी येथे बोलावून धमकी देत विनयभंग केला. त्यानुसार पोलिसात तक्रार दिली असता त्यावर अनेक दिवस कारवाई झाली नव्हती. अखेर रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिकक्षकांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर खेरटकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. परंतू सावकारी प्रकरणात झालेल्या फसवणूकी बाबत ठोस कारवाई अद्याप केली जात नाही. या सावकारीत ३ लाख ९० हजार रूपयांच्या मोबदल्यास सुमारे २२ लाख रूपये मोजावे लागले. तरिही सावकार आपला व कुटुंबियाचा छळ करीत आहेत. त्यासाठी काही तरूण आपल्यावर लक्ष ठेवून असतात. याबाबतही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास पोलिस स्थानकासमोर आत्मदहन करण्यापलिकडे कोणताही मार्ग राहिलेला नाही, त्यासाठीच २६ जानेवारीस उपोषण करणार असल्याचे उज्मा मुल्लाजी हिने सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळा चिपळूणकर व नातेवाईक उपस्थित होते.
सावकारी प्रकरणात गंभीरपणे तपास सुरू असून खेर्डी येथील अनधिकृत सावकार ईकबाल गनी खेरटकर यास ३ जानेवारीला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका झाली. त्याच्याघरी सहायक निबंधकाच्या पथकाने धाड टाकली असता कोरे धनादेश, बॉण्ड पेपर आढळले आहे. त्यामध्ये उज्मा मुल्लाजी हिने उल्लेख केलेले कागदपत्रेही सापडली आहेत. याप्रकरणाचा अजुनही तपास सुरू असून सावकाराच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे. - पंकज खोपडे, पोलिस उपनिरीक्षक, चिपळूण