शिक्षकांच्या रिक्त ७०० पदांसाठी होणार भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:44 PM2019-02-19T13:44:58+5:302019-02-19T13:46:22+5:30
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे.
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिक्षक भरती होणार हे निश्चित आहे.
मागील १० वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक भरती करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी पालकवर्गातून होत आहे.
शिक्षक भरतीच न झाल्याने डी. एड. पदवीधारक सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण २६५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांसाठी ६८०० शिक्षक मंजूर आहेत. त्यापैकी शिक्षकांची ७०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाला शैक्षणिक घडी बसविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी अनेक शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांवर कामगिरीवर काढण्यात आले आहे.
निवडणुकीपूर्वी लवकरच शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे शासनानेही जाहीर केले होते. मात्र, मराठा आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळावी, यासाठी ही भरती उशिरा होत आहे.
नवीन निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांनाही या शिक्षक भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया करताना शिक्षण विभागाकडून इतर प्रवर्गासह त्यांच्यासाठी शिक्षक पदांमध्ये आरक्षण ठेवावे लागणार असून, त्यादृष्टीने काम सुरु आहे.
प्रक्रियेची तयारी सुरु
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेसाठी तयारी सुरु केली आहे. शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांच्यासह कर्मचारी ही भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी मेहनत घेत आहेत.