गतवर्षीच्या कोरोना स्थितीची होतेय पुनरावृत्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:21+5:302021-04-01T04:32:21+5:30

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. ...

A recurrence of last year's corona condition ... | गतवर्षीच्या कोरोना स्थितीची होतेय पुनरावृत्ती...

गतवर्षीच्या कोरोना स्थितीची होतेय पुनरावृत्ती...

Next

रत्नागिरी : मार्च २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून त्यात सातत्याने वाढ होत गेली. मार्च २०२१ अखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. वर्षभरात तब्बल ११ हजार रुग्ण वाढले, तर या वर्षात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आता शिमग्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढू लागली असून, शिमग्याप्रमाणेच आता आंब्याच्या हंगामात, उन्हाळी सुटीच्या कालावधीत पुन्हा या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती होणार आहे.

गेल्या वर्षी १८ मार्च रोजी जिल्ह्यात शृंगारतळी येथील पहिला कोरोना रुग्ण सापडला. मात्र, २३ मार्चपासून संपूर्ण देशातच संचारबंदी सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग काही दिवस थांबला. त्यानंतर जिल्ह्यात दुसरा रुग्ण १४ दिवसांनंतर सापडला. ३ एप्रिल रोजी एक आणि त्यानंतर चार रुग्ण सापडले. यापैकी एकाचा ८ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ६ झाली. महिना झाला तरी संचारबंदी उठेना. मुंबईत काेरोना वेगाने पसरू लागला. त्यामुळे मुंबईतील संचारबंदीला कंटाळलेले आणि कोरोनाच्या भीतीमुळे काेकणातील चाकरमानी मे महिन्यात आपल्या गावाला धावले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. जून महिन्यापासून स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले. कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली. गणेशोत्सवादरम्यान ही संख्या साडेसात हजारांपर्यंत पोहोचली. मार्चअखेर ही संख्या ११ हजारांवर पोहोचली आहे. ३७० रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे.

गतवर्षीप्रमाणेच आता मार्चमध्ये होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांमुळे काेरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत खाली आलेला रुग्णसंख्येचा आलेख मार्चपासून पुन्हा वाढू लागला आहे. आता एप्रिल-मेपासून पुन्हा उन्हाळी सुटीतील पर्यटन, आंबा, फणस, काजूचा हंगाम यामुळे मुंबईकर पुन्हा गावाला बहुसंख्येने येणार आहेत. अजूनही लसीकरण, तसेच चाचण्यांबाबत नागरिकांमध्ये बेफिकिरी आणि उदासीनता असल्याने आता पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पुन्हा आरोग्य यंत्रणेसाठी कसोटी ठरणार आहे.

Web Title: A recurrence of last year's corona condition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.