रत्नागिरीला रेड अलर्ट; राजापुरात पुन्हा पूरस्थिती, जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांसह राजापूर दौऱ्यावर
By शोभना कांबळे | Published: July 26, 2023 02:31 PM2023-07-26T14:31:43+5:302023-07-26T14:32:07+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात ...
रत्नागिरी : जिल्ह्यात काल, मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह हे जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह राजापूर तालुका दौऱ्यावर सकाळीच रवाना झाले आहेत.
जिल्ह्यात बुधवारीही पावसाची संततधार कायम आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर करताच जिल्हाधिकाऱ्यांनी आज, बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा - महाविद्यालये यांना सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तसेच लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. १९ आणि २० जुलै या दोन दिवसांत २५० मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला आहे. त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आहे.
बुधवारी सकाळीच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजापुरात दाखल झाले. संपूर्ण प्रशासन आपत्तींच्या अनुषंगाने लक्ष ठेऊन आहे. दरडग्रस्त तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन रहावे. तसेच सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काही आपत्ती आल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
राजापुरात पुन्हा पूरस्थिती
अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
गत आठवड्यात पावसाने जोर घेतला होता. त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.