रेडक्रॉसमुळे दोन हजार व्यक्तींना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:12 PM2019-05-08T16:12:24+5:302019-05-08T16:14:54+5:30
रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले आहे.
युद्धात जखमी होणारे सैनिक, आपद्ग्रस्त यांना मदत करण्याच्या गरजेतून रेडक्रॉस संस्थेची स्थापना करण्यात आली. रत्नागिरीत डॉ. श्रीधर सामंत यांच्या हॉस्पिटलच्या एका छोट्याशा जागेत १९८१ साली रेड क्रॉस सोसायटीचे कामकाज सुरू झाले.
सुरूवातीला आश्रमशाळा, तसेच इतर शाळांतील गरजू मुलांना टुथपेस्ट, पावडर, बिस्कीटे यांचे वाटप करण्यास सोसायटीने प्रारंभ केला. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी जिल्ह्यात एकमेव शासकीय रूग्णवाहिका तसेच शववाहिका होती. त्यामुळे सामान्य रूग्णांची गरज लक्षात घेऊन सोसायटीने वाहन विकत घेऊन जिल्ह्यात रूग्णवाहिका तसेच शववाहिका उपलब्ध करून दिली. सोसायटीने ना नफा ना तोटा या तत्वाने ही सेवा १२ वर्षे रूग्णांसाठी अत्यल्प उपलब्ध करून दिली होती.
अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आजारांचेही स्वरूप बदलले. अशावेळी अपघातात जखमी होऊन किंवा विविध जीवघेण्या आजाराने बेजार झालेल्या, भाजलेल्या रूग्णांसाठी वेळेवर रक्त मिळणे गरजेचे असते. त्याकाळी रत्नागिरीत रक्तपेढी नसल्याने रूग्णाला अत्यवस्थ स्थितीत पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर येथे हलवावे लागे किंवा तातडीने रक्त मागवावे लागे.
यासाठी येणाऱ्या तांत्रिक, आर्थिक अडचणीमुळे बरेचदा रूग्ण दगावण्याच्या घटना घडत असत. ही गैरसोय लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीने २४ फेब्रुवारी १९८३मध्ये रेडक्रॉस ब्लड बँकेची सुरूवात केली. या ब्लड बँकेमुळे आतापर्यंत हजारो रूग्णांना जीवनदान मिळवून त्यांच्या कुटुंबात आनंदाची पहाट निर्माण केली आहे.
सामाजिक कार्यात आतापर्यंत कार्य करत आलेल्या रेडक्रॉस सोसायटीच्या या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्याचा गौरव करून राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा मेरिट सर्टिफिकेट आणि राजा महाराजा ट्रॉफीने या सोसायटीचा गौरव करण्यात आला आहे.
समाजामध्ये रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाले आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. सामाजिक बांधिलकीतून रक्तदानासारखी शिबीरे आयोजित करण्याकडे विविध संस्थांचा, संघटनांचा कल वाढला आहे. या रक्तदात्यांचा इंडियन रेडक्रॉस सोसायटीला मोठा हातभार मिळत आहे. कुठल्याही क्षणी बोलावताच हे दाते रक्तपेढीत येवून रक्तदानासाठी सहकार्य करतात. रक्तपेढीच्या कार्यात या रक्तदात्यांचे योगदान महत्वाचे आहे.
- डॉ. श्रीधर सामंत, मानद सचिव,
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी.