ड्युटीचा कालावधी कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:23+5:302021-05-05T04:50:23+5:30
खेड : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोनाच्या संकटात पोलीस मित्र म्हणून २८ एप्रिल ते १५ मेपर्यंत सकाळी ७ ते ...
खेड : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना कोरोनाच्या संकटात पोलीस मित्र म्हणून २८ एप्रिल ते १५ मेपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ अशी सलग १२ तास ड्युटी देण्यात आली आहे. हा ड्युटीचा कालावधी कमी करून ८ तासांची ड्युटी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
रस्त्याची कामे दर्जेदार व्हावीत
राजापूर : राजापूर शहर भागातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. या कामामुळे बाधित होणारे मंदिर, गणेशघाट तसेच पोचरस्त्याची कामे योग्य रीतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केली आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
गणपतीपुळे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून कडकम अंमलबजावणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या गणपतीपुळे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही मालगुंड येथील तपासणी नाक्यावर कडक अंमलबजावणी सुरु केली आहे.
धाऊलवल्ली रस्त्याचे काम निकृष्ट
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली गावात सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप या भागातील जयेंद्र कोठारकर यांनी केला आहे. काँक्रीटऐवजी मातीचा भराव टाकून मोरी बांधण्यात येत आहे.
कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रुग्णांना लॉकडाऊन कालावधीत उपचारांसाठी अन्यत्र जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी कोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
बँक संघटना आक्रमक
रत्नागिरी : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधातील विविध बँक संघटनांनी ५ कोटी जनतेच्या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सह्यांचे पिटीशन प्रधानमंत्री व लोकसभेचे सभापती यांना पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या बँक खासगीकरणाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे.
अभिजित तेली यांनी फिरती भत्ता दिला
राजापूर : माजी सभापती व विद्यमान सदस्य अभिजित तेली यांनी कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यासाठी आपल्या फिरती भत्त्याची रक्कम व पंचायत समिती सेस फंडातून ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल तेली यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
महामार्गाचे काम बारगळणार
गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात जागेच्या प्रश्नांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी महामार्गाचे काम बारगळणार आहे. तर, चिखलीपासून काळजीपर्यंतच्या मार्गावरील दोन पुलांचा आराखड्यात समावेश नसल्याने येथील काम बारगळणार आहे.
ग्रामस्थ आंदोलन करणार
दापोली : बांधतिवरे नदीकिनारी सुरू असलेले अवैध उत्खनन बंद न झाल्यास हर्णै सुकाणू समिती व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे.
मार्ग तीन दिवसांपासून बंद
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी यंत्रणांची दिवसरात्र घरघर गतीने सुरू आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी आंबवलीच्या दिशेने जाणारा मार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.
दापोली दुसऱ्या स्थानावर
दापोली : लसीकरणामध्ये दापोली शहर जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ५,२७४ जणांनी लस घेतल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयातील ५ नर्स व एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
नोंदणी करूनही लस मिळेना
रत्नागिरी : लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. कोविन या संकेतस्थळावर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर ओटीपी त्या मोबाइल नंबरवर पाठवला जातो.