वीजनिर्मितीसाठीच्या पाण्यामध्ये कपात

By admin | Published: April 21, 2016 09:24 PM2016-04-21T21:24:39+5:302016-04-22T01:04:25+5:30

कोयना जलविद्युत प्रकल्प : पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा आटला...

Reduction in electricity generation | वीजनिर्मितीसाठीच्या पाण्यामध्ये कपात

वीजनिर्मितीसाठीच्या पाण्यामध्ये कपात

Next

सुभाष कदम -- चिपळूण --महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी झाली असली तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने घटला. राज्यात पडलेला दुष्काळ व तीव्र पाणीटंचाई यामुळे वीजनिर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या कोट्यापैकी १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आले आहे. त्याचा फटका राज्य सरकारला बसणार आहे.
कोयना धरणात १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. दरवर्षी १ जून ते ३१ मे या कालावधीत पोफळी, कोयना चौथा टप्पा व अलोरे या तीन जलविद्युत प्रकल्पासाठी ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी दिले जाते. पाणीवाटप लवादानुसार हा कोटा वीजनिर्मितीसाठी दिला जातो, तर आॅक्टोबरनंतर पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी २२ टीएमसी किंवा गरजेनुसार जादा पाणी सोडण्याची तरतूद आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोयनेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातच दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीच्या पाणी कोट्यात १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आले. त्यामुळे पोफळी, चौथा टप्पा व अलोरे या वीजनिर्मिती केंद्रात सुमारे ६६ कोटी ५० लाख युनिट वीजनिर्मिती कमी होणार आहे. त्यामुळे ३ अब्ज ९८ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न पाण्यात जाणार आहे.
चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली. त्यामुळे पूर्वेकडील विभागासाठी कोयना धरणातून सिंचनासाठी सातत्याने पाणी सोडावे लागले. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणातून २७.२० टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले असून, धरण पायथा वीजगृहातून या पाण्यावर ११७.६२३ दशलक्ष युनिट इतकी वीज तयार करण्यात आली. कमी पावसामुळे वर्षभरात केवळ ७४.२८ टीएमसी पाणी धरणात जमा झाले. त्यातील सिंचनासाठी जादा पाणी देण्याची वेळ आली आहे. आजपर्यंतचा काळ सुखात गेला असला तरी आता धरणात केवळ ३२.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावरच आता ३१ मेपर्यंतचे तांत्रिक वर्ष व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत वीजनिर्मिती, शेती व पिण्याच्या पाण्यासह मृत पाणीसाठ्याबाबतही काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासन व प्रशासनानेही पश्चिमेकडील वीजनिर्मितीच्या पाणी कोट्याला कात्री लावली आहे. दरवर्षी ६७.५० टीएमसी पाणी कोट्याला आता १५ टीएमसीची कात्री लावल्याने वीजनिर्मितीसाठी ५२.५० टीएमसी पाणी वापराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत ४२.५२ टीएमसी पाणी वापरून झाल्याने ३१ मेपर्यंत उर्वरित ९.७८ टीएमसी पाण्यावरच वीजनिर्मितीचे भवितव्य अवलंबून आहे.
पोफळी, कोयना चौथा टप्पा व अलोरे या वीज प्रकल्पातून ४२.७२ टीएमसी पाण्यावर १८९२.६६९ दशलक्ष युनिट वीज तयार करण्यात आली. म्हणजेच चालू वर्षी १ टीएमसी पाण्यावर सरासरी ४ कोटी ४३ लाख २७ हजार ५४० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षी याच काळात २८००.६०० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. चालू वर्षी वीजनिर्मितीसाठी पाणी कपात झाल्याने आतापर्यंत ९०७.९३१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली आहे. यावर्षी १५ टीएमसी पाणी कमी वापरले गेल्याने ६६ कोटी ४९ लाख १३ हजार १०० युनिट वीजनिर्मिती कमी होईल. त्यामुळे राज्याच्या महसूल उत्पन्नातही तूट येणार आहे. हा तोटा अंदाजे ३ अब्ज ९८ कोटी ९४ लाख ७८ हजार ६०० रुपये इतका होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात असणाऱ्या दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असताना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार असल्याने राज्य शासन तोट्यात आहे. पडणाऱ्या पावसावरच आणि निसर्गाचे मिळणारे सहकार्य यावरच हे आर्थिक गणित अवलंबून आहे.

कोयना धरणाच्या पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.
वीजनिर्मिती कमी होणार असल्याने ३ अब्ज ९८ कोटी रुपयांचा महसूल जाणार पाण्यात.
दरवर्षी ६७.५० टीएमसी पाण्यावर होतेय वीजनिर्मिती.
पश्चिमेकडे वीजनिर्मिती करुन पूर्वेकडे सिंचनासाठी सोडले जाते पाणी.
दुष्काळाच्या झळा व पाणीटंचाई यामुळे वीजनिर्मितीसाठी १५ टीएमसी पाण्यात कपात.
पोफळी वीजगृह, कोयना चौथा टप्पा व अलोरे वीजगृह येथे होतेय वीजनिर्मिती.
निसर्गाच्या सहकार्यावरच अवलंबून आर्थिक गणित.

तिजोरीवर भार : प्रतियुनिटचा सरासरी दरही कमी?
कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती घटणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. महावितरण कंपनीचे धोरण व दराचा विचार करता घरगुती वापरासाठी प्रतियुनिट ३ रुपये ५० पैसे, तर व्यावसायिकांसाठी प्रतियुनिट ७ रुपये दर आकारण्यात येतो. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक वापरासाठी वीज उपलब्ध झाली असती तर त्यातून सरासरी ६ रुपये प्रतियुनिट उत्पन्न शासनाच्या पदरात पडले असते. परंतु, सद्यस्थितीत ही शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडाला आहे.

सिंचनासाठी अधिक पाणी सोडले
पोफळी जलविद्युत प्रकल्प, कोयना चौथा टप्पा व अलोरे या वीज प्रकल्पातून आतापर्यंत १८९२.६६७ दशलक्ष युनिट वीज तयार झाली आहे. परंतु, आता पाणी कपात होणार असल्याने यापुढील वीज निर्मिती घटणार आहे. सिंचनासाठी अधिक पाणी सोडल्यामुळे वीज निर्मितीसाठी पाणी कमी पडले आहे.

Web Title: Reduction in electricity generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.