इंधनदरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:24+5:302021-09-08T04:37:24+5:30
रत्नागिरी : पेट्रोल, डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात झाली आहे. रविवारी झालेल्या या दर कपातीने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला ...
रत्नागिरी : पेट्रोल, डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात झाली आहे. रविवारी झालेल्या या दर कपातीने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५ पैशांची कपात झाली आहे. पेट्रोल १०७ रुपये, तर डिझेल ९६ रुपये लीटर झाले आहे.
विद्यार्थी गुणवत्ता यादी
लांजा : महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा २०२०-२१चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये लांजा तालुक्यातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, हर्चेचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. पार्थ सकपाळ जिल्ह्यात प्रथम, अत्तदीप पवार चौथा आला आहे.
पाणी योजनेचे भूमिपूजन
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली, गावठाण, बौद्धवाडी येथे मंजूर झालेल्या पाण्याची टाकी बांधणे व नळपाणी पुरवठा योजना तयार करणे या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेंतर्गत हे काम आहे. या योजनेमुळे आता या भागातील लोकांची पाणीटंचाई समस्या दूर होणार आहे.
दरडमुक्त सह्याद्री अभियान
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथे दरड कोसळणे, या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून दरडमुक्त सह्याद्री या उपक्रमांतर्गत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा अतिवृष्टीमुळे जागोजागी दरड कोसळण्याचे प्रकार घडले. या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या दृष्टीने सृष्टी ज्ञान संस्था, मुंबई आणि देवरुख येथील संकल्प सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंगवलीत ही परिषद घेण्यात आली.
चाकरमान्यांचे आगमन
मंडणगड : यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा केला जाणार असला तरीही गणेशभक्त हा उत्सव साजरा करण्याकरिता आतूर झाले आहेत. तीन दिवसांवर आलेल्या या उत्सवासाठी आता चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा वर्दळ वाढली आहे.
एनएमएमएस परीक्षेत यश
दापोली : तालुक्यातील वाकवली येथील विश्राम रामजी घोले हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले आहे. या परीक्षेला २३ विद्यार्थी बसले होते. यापैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली आहे. प्राचार्य एम. ए. पाटील, पर्यवेक्षक एस. के. पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
महामार्गाची दुर्दशा
साखरपा : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गाची पुन्हा सुरू झालेल्या पावसाने अधिकच दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, साईडपट्ट्यांवर गवत वाढले आहे. तसेच गटारांमध्ये झाडेझुडपे वाढल्याने वाहनचालकांना कसरत करतच प्रवास करावा लागत आहे. सध्या गणेशोत्सवात या मार्गावर वर्दळ वाढली असल्याने या दुर्दशेमुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.