रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या भविष्यकालीन विकासाची नांदी : जमीर खलिफे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:16+5:302021-08-24T04:36:16+5:30
राजापूर : तालुक्यात नव्याने गोवळ, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी वाढती मागणी आणि समर्थन निश्चितच ...
राजापूर : तालुक्यात नव्याने गोवळ, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी वाढती मागणी आणि समर्थन निश्चितच भविष्यातील राजापूरच्या विकासाची नांंदी आहे. या प्रकल्पाचे जाहीर समर्थन करून राजापूर नगर परिषदेने उचललेले पाऊलही तेवढेच महत्त्वाचे आणि भविष्यातील शहराच्या विकासाला गती देणारे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून विकास तर होणार आहेच पण राजापूर तालुक्यात एक अद्ययावत सुविधांनी युक्त असे रूग्णालय उभारले जाणार आहे, अशी माहिती राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी व्यक्त केली आहे.
राजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. खलिफे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध होता, कारण याठिकाणी होणारे विस्थापन, धार्मिक स्थळांना निर्माण होणारी बाधा यामुळे हा विरोध होता व तो सार्थ होता. मात्र आता नव्याने बारसू, गोवळ, सोलगाव व या परिसरातील मोकळ्या जागेत हा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा सुरू आहे. कंपनीकडूनही तशी पाहणी करून जागेबाबत संमती दर्शविली जात आहे. याठिकाणी होणाऱ्या एमआयडीसी प्रकल्पाबरोबरच हा प्रकल्प आला तर निश्चितच याठिकाणी विकासाला गती मिळणार आहे. त्यातही राजापूर शहरापासून जवळ असल्याने त्याचा शहरालाही फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बेरोजगारी काय समस्या आहे, याची आपल्याला चांगली जाणीव आहे. मी स्वत: इलेक्ट्रीकल इंजिनिअर आहे, बीएससी करून मग एलएलबी केले आहे. नोकरीसाठी तरूणांना काय वणवण करावी लागते, याची मला जाणीव आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून अन्य अनेक पूरक उद्योग राजापुरात येणार आहेत. महिला बचत गटांना, छोटया व्यावसायिकांना काम मिळणार आहे, अशी माहिती खलिफे यांनी दिली.
------------------------
शिवसेनेलाही प्रकल्पाचे महत्त्व पटले
आता या परिसरात प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत आहे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बेरोजगार तरूण या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत तर शिवसेनेकडूनही याठिकाणी आता या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. उशिरा का होईना, शिवसेनेला या प्रकल्पाचे महत्त्व पटले त्याचे स्वागतच आहे, असेही ॲड. खलिफे यांनी सांगितले.