रिफायनरी प्रकल्प : नाणार येथे दोन दिवसांचा विजयोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:30 AM2019-03-12T11:30:40+5:302019-03-12T11:31:55+5:30
तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.
राजापूर : तेलशुध्दीकरण प्रकल्प रद्द झाल्यामुळे नाणार येथे दोन दिवस आयोजित करण्यात येत असलेल्या विजयोत्सवात कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून १७ मार्चला राजकीय भूमिका जाहीर केली जाणार असल्याने नक्की कोणती घोषणा होणार, याकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशोक वालम यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेची स्थापना केली गेली होती. त्यानंतर अनेक आंदोलने छेडली गेली. सुरुवातीला पक्षविरहीत असलेली कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने नंतर मात्र भाजपवगळता प्रत्येक राजकीय पक्षाकडे धाव घेतली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना भेटून नाणारविरोधी लढ्याला पाठबळ द्यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार काही पक्षांकडून प्रकल्प परिसरात नाणार विरोधात सभादेखील झाल्या होत्या. प्रकल्पविरोधाचा आधार घेऊन परिसरातील गावांत आपला जनाधार वाढवायचा, हा हेतू काही लपून राहिलेला नव्हता.
मात्र प्रकल्पग्रस्तांनी सर्वच सभांना लावलेल्या उपस्थितीमुळे नक्की हा जनाधार कुणाकडे आहे, त्याचा अंदाज आंदोलनातील सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना लागत नव्हता, तर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेकडून पुढील राजकीय वाटचालीबाबत कुठलीच दिशा स्पष्ट करण्यात आली नव्हती. जो पक्ष प्रकल्प रद्द करील, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू, एवढेच वारंवार सांगितले जात होते.
सेना-भाजपमधील युतीसाठी नाणार रद्द करावा लागला आणि प्रकल्पग्रस्त जनतेला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक पक्षाने आपल्यामुळेच नाणार गेल्याचे दावे-प्रतिदावे सुरु केले असून, या महिन्याच्या १६ व १७ मार्चला नाणारमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. १७ मार्चला संघर्ष संघटना आपल्या पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.
नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेकडून आता याबाबत कोणती भूमिका स्वीकारली जाते. त्याचा आपल्या पक्षाला कितपत फायदा होईल, यावर चर्चांना उधाण आले आहे. याबाबत मतमतांतरे सुरु झाली असून, आडाखेदेखील बांधले जाऊ लागले आहेत. त्यामुळे प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व करणारे संघटनेचे नेते अशोक वालम १७ मार्चला कोणती भूमिका घेतात, त्याकडे आता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.