रिफायनरी प्रकल्प होणारच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ठाम विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 03:49 PM2022-11-26T15:49:11+5:302022-11-26T15:50:12+5:30
संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. मात्र त्यांना शिवसेनेने तिकीट दिले तेव्हा ते रेडे नव्हते. आताच ते रेडे कसे झाले, असा प्रश्न आमदार बावनकुळे यांनी केला.
रत्नागिरी : आजपर्यंत विविध प्रकल्पांवरुन राजकारण झाले. प्रकल्पांचा फुटबॉल केल्यानेच रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याने रिफायनरी प्रकल्पाबाबत असे होऊ देणार नाहीत. लोकांचे गैरसमज दूर करुन रिफायनरी प्रकल्प होईल, असे ठाम विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत आमदार बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रकल्प उभारण्यासाठी जे ठिकाण निश्चित केले जाईल, तेथेच प्रकल्प उभा होईल. त्यासाठी सरकार ठामपणे उभे आहेच, पण कोणी उगाच विरोध करत असतील तर पक्षही तेथे ठाम उभा राहील. आतापर्यंत अनेक प्रकल्पांचा फुटबॉल करण्यात आला आहे. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे होऊ देणार नाहीत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकही प्रकल्प परत जाण्याचा प्रश्नच येणार नाही.
नागरिकांचे, शेतकऱ्यांचे हित जोपासून पुढील ५० वर्षांचा विकास होत असेल तर तो करायलाच हवा. सरकारची इच्छाशक्ती असेल तर गैरसमज दूर करुन विरोध संपवता येतो. प्रश्न सोडवून त्यांचे समाधान केले तर विरोध होत नाही. काही राजकारणी जेव्हा ‘कन्व्हिन्स’ करु शकत नाहीत, तेव्हा ते ‘कन्फ्यूज’ करतात. म्हणून लोक विरोध करतात. मात्र शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या मनात काय आहे, हे समजून घेऊन त्यावर पर्याय देतील. त्यामुळे विरोध राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
शिवसेना सोडून भाजपचा हात धरणाऱ्या आमदारांनी जनतेशी प्रतारणा केली आहे, असे वाटत नाही का, असा प्रश्न बावनकुळे यांना करण्यात आला. या आमदारांना जनतेने शिवसेना भाजप म्हणून निवडून दिले होते. मात्र युतीने आलेल्या शिवसेनेने सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हात मिळवणी केली, ही जनतेशी, मतदारांशी प्रतारणा नव्हती का? राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे म्हणण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.
आताच ‘रेडे’ कसे झाले?
संजय राऊत आमदारांना रेडे म्हणतात. मात्र त्यांना शिवसेनेने तिकीट दिले तेव्हा ते रेडे नव्हते. आताच ते रेडे कसे झाले, असा प्रश्न आमदार बावनकुळे यांनी केला. त्यामुळे असे बोलणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानांबाबत प्रश्न कशाला विचारता, असेही बावनकुळे यांनी हसत हसत विचारले